बाबर आझमच्या नेतृत्त्वाखालील पाकिस्तान संघ आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ मध्ये जबरदस्त लयीत दिसत आहे. त्यांनी विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिद्वंद्वी भारतावर १० विकेट्सने ऐतिहासिक विजय मिळवला. त्यानंतर पुढील सलग ३ सामने जिंकत त्यांनी उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे. मंगळवार रोजी (०२ नोव्हेंबर) नामबियाविरुद्ध विश्वचषकातील चौथा सामना खेळताना त्यांनी ४५ धावांनी बाजी मारली आणि उपांत्य फेरीचे तिकीट मिळवले आहे. यासह त्यांच्या खात्यात मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
पाकिस्तान संघाने सर्वप्रथम भारताला पराभूत करत त्यांच्या टी२० विश्वचषक मोहिमेचा शुभारंभ केला होता. त्यानंतर पाकिस्तानने बलाढ्य न्यूझीलंडला त्यांच्या पहिल्याच सामन्यात ५ विकेट्सने पराभूत केले. पुढे अफगाणिस्तान (५ विकेट्स) आणि नामबिया संघांवरही पाकिस्तानने विजय मिळवला आहे. अशाप्रकारे सलग ४ सामने जिंकत पाकिस्तानने ८ गुणांसह गुणातिलेकतील आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. यासह त्यांच्यासाठी उपांत्य फेरीचे दारही उघडे झाले आहे.
पाकिस्तानने टी२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरी सामन्यात प्रवेश करण्याची ही तब्बल पाचवी वेळ आहे. यासह पाकिस्तानचा संघ टी२० विश्वचषकाच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक वेळा उपांत्य फेरी सामना गाठणारा संघ बनला आहे.
सर्वप्रथम टी२० विश्वचषकाच्या पहिल्याच हंगामात अर्थात २००७ मध्ये पाकिस्तानने उपांत्य फेरीतच नव्हे तर अंतिम सामन्यातही प्रवेश केला होता. परंतु त्यांना अंतिम सामन्यात भारताच्या हातून पराभवास सामोरे जावे लागले. त्यानंतर २००९ मध्ये झालेल्या हंगामात पाकिस्तान संघाने टी२० विश्वचषक जिंकला होता. पुढे २०१० आणि २०१२ मध्येही पाकिस्तान संघाने उपांत्य फेरीपर्यंत मजल होती.
पाकिस्ताननंतर श्रीलंका आणि वेस्ट इंडिज संघ या विक्रमाच्या यादीत संयुक्तपणे दुसऱ्या स्थानी आहेत. त्यांनी आतापर्यंत ४ वेळा उपांत्य सामन्यात प्रवेश केला आहे. तर ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघांनी ३ वेळा टी२० विश्वचषकाचा उपांत्य फेरी सामना खेळला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ईशानला रोहितऐवजी सलामीला पाठवण्याची कोणी केली होती प्लॅनिंग? फलंदाजी प्रशिक्षकांनी केला खुलासा
‘जितने की आदत हो गयी है’, पाकिस्तानच्या विजयी ‘चौकारा’नंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पूर






