आशिया चषकापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला मोठा मान मिळाला आहे. देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘सितारा-ए-पाकिस्तान’ पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्याच्याशिवाय पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची कर्णधार बिस्माह महरूफ हिलाही ‘तमगा-ए-पाकिस्तान’ देण्यात येणार आहे. हे पुरस्कार २३ मार्च २०२३ रोजी प्रदान केले जातील. सितारा-ए-पाकिस्तान हा पाकिस्तानचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. देशाच्या सुरक्षेसाठी, जागतिक शांततेसाठी, देशाच्या संस्कृतीच्या संवर्धनासाठी आणि सार्वजनिक जीवनाच्या सुधारणेसाठी काम करणाऱ्या लोकांना ते दिले जाते.
एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, बाबर आझम हा एकमेव खेळाडू नाही ज्याला पाकिस्तानचा नागरी सन्मान दिला जाईल. त्यांच्याशिवाय राष्ट्रकुल स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारा भालाफेकपटू अर्शद नदीम आणि वेटलिफ्टर नोहा बट यांचाही गौरव करण्यात येणार आहे. या दोन्ही खेळाडूंना ‘प्राईड ऑफ परफॉर्मन्स’ पुरस्कार देण्यात येणार आहे. नदीमने बर्मिंगहॅम येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भालाफेक स्पर्धेत ९० मीटरपेक्षा जास्त अंतरापर्यंत भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले. त्याचप्रमाणे नोहा बटनेही बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील वेटलिफ्टिंगमध्ये १०९ किलो अधिक गटात विक्रमी ४०५ किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले.
बाबर आझमची बॅट जोरदार बोलते आहे
बाबर आझमची बॅट गेल्या काही वर्षांपासून जोरदार बोलते आहे. बाबरने यंदाही आतापर्यंत चांगली फलंदाजी केली आहे. त्याने पाकिस्तानसाठी कसोटीत सर्वाधिक धावा केल्या आहेत. बाबरने ५ कसोटीत ७३च्या सरासरीने ६६१ धावा केल्या आहेत. त्याने २ शतके आणि ४ अर्धशतके केली आहेत. बाबर वनडे आणि टी-२० मध्येही रन मशीन आहे. विश्वचषक सुपर लीगमध्ये हजाराहून अधिक धावा करणारा बाबर हा एकमेव फलंदाज आहे. त्याने १५ सामन्यांमध्ये ६ शतके आणि ४ अर्धशतकांच्या मदतीने एकूण १०८३ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट १०० पेक्षा जास्त आहे आणि सरासरी ८३च्या वर आहे. बाबर सध्या वनडे आणि टी-२० मध्ये जगातील नंबर १ फलंदाज आहे. शिवाय कसोटी क्रमवारीत तो तिसऱ्या स्थानावर आहे.
दोन आठवड्यांनंतर बाबरच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा संघ आशिया चषक स्पर्धेत उतरणार आहे. या स्पर्धेतील पाकिस्तानचा पहिला सामना भारताविरुद्ध आहे. गेल्या वर्षीच्या टी-२० विश्वचषकानंतर उभय संघांमधील ही पहिलीच लढत असेल. त्यानंतर पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून पराभव केला होता. यंदा मात्र, दोन्ही संघात अतितटीची टक्कर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवाय अनेक क्रिकेट दिग्गजांच्या मते यावेळी भारतीय संघ या लढतीत बाजी मारेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आशिया चषक बेंचवर बसून घालवतील ‘हे’ दोन भारतीय खेळाडू! संघात आधीच दिग्गजांची भरमार
भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूची वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून माघार, पण काय आहे कारण?
Video: मुंबई इंडियन्सच्या युवा फलंदाजाचा ‘द हंड्रेड’मध्ये कहर, सलग ४ चेंडूंवर ठोकले षटकार






