पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघादरम्यान दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना आज समाप्त झाला. अपेक्षेप्रमाणेच न्यूझीलंड संघाने या सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत, प्रथमच आयसीसी कसोटी क्रमवारीत नंबर 1 स्थान पटकावले आहे. पाकिस्तान संघ या सामन्यात नियमित कर्णधार बाबर आझमच्या अनुपस्थित खेळत होता.
बाबरच्या अनुपस्थितीत यष्टिरक्षक मोहम्मद रिजवानने संघाचे नेतृत्व केले. रिजवानने या सामन्यात पाकिस्तान संघासाठी उत्तम कामगिरी केली, मात्र त्याच्या फलंदाजी पेक्षा सर्वत्र चर्चा झाली ती त्याच्या एका मजेशीर डान्सची.
पाकिस्तान संघ सामन्याच्या पाचव्या दिवशी फलंदाजी करत होता. यावेळी कर्णधार मोहम्मद रिजवान सोबत फवाद आलम फलंदाजी करत होता.या भागीदारी दरम्यान एका षटकात मोहम्मद रिजवानने मैदानात एका विचित्र प्रकारचे हावभाव केले. रिजवान फलंदाजीसाठी उभा असताना त्याने सिली पॉईंट पर्यंत जात एक वेगळ्याच प्रकारचा धावण्याचा प्रयत्न केला. काही क्षणातच हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, चाहत्यांनी सोशल मिडियावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
https://twitter.com/BLACKCAPS/status/1344088835227971585
दरम्यान पाकिस्तान संघाला पहिल्या कसोटी सामन्यात पराभवाचे तोंड बघायला लागले आहे. न्यूझीलंडने या सामन्यात पाकिस्तानचा 101 धावांनी धुव्वा उडवला आहे. पाकिस्तानकडून दुसऱ्या डावात काही प्रमाणात संघर्ष बघायला मिळाला. कर्णधार मोहम्मद रिजवान व फवाद आलम यांच्यात शतकी भागीदारी देखील झाली होती. फवादने 102 धावांची शतकी खेळी केली तर, कर्णधार रिजवानने 60 धावा केल्या. मात्र या दोघांचा संघर्षही पाकिस्तानला पराभवापासून वाचवू शकला नाही.
महत्वाच्या बातम्या:
– डेविड वॉर्नरचे पुनरागमन! असा आहे भारताविरुद्ध तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया संघ
– अटीतटीच्या बॉक्सिंग डे कसोटीत न्यूझीलंडचा पाकिस्तानवर दणदणीत विजय
– काश्मीरमधील लोकांवर अत्याचार होतोय, पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीचे वादग्रस्त विधान






