मंगळवार रोजी (२६ ऑक्टोबर) शारजाह येथे पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ चा १९ वा सामना पार पडला. नुकताच भारतीय संघाचा दारुण पराभव केलेल्या पाकिस्तानने या सामन्यातही अप्रतिम खेळ दाखवला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडला निर्धारित २० षटकांमध्ये ८ विकेट्सच्या नुकसानावर १३४ धावाच करता आल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानने फलंदाजीत सांघिक कामगिरी करत १८.४ षटकातच ५ विकेट्स राखून विजय मिळवला आहे. हा त्यांचा सुपर १२ फेरीतील सलग दुसरा विजय आहे.
न्यूझीलंडच्या १३५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानकडून सलामीवीर मोहम्मद रिझवान याने सर्वाधिक ३३ फटकावल्या. ३४ चेंडूंचा सामना करताना ५ चौकारांच्या मदतीने त्याने या धावा केल्या. कर्णधार बाबर आझम या सामन्यात विशेष योगदान देऊ शकला नाही. अवघ्या ९ धावांवरच टीम साउथीने त्याची दांडी गुल केली. पुढे पाकिस्तानचे ३ फलंदाज प्रत्येकी ११ धावांवर पव्हेलिनयला परतले.
मात्र अनुभवी अष्टपैलू शोएब मलिक आणि असिफ अली यांनी अंतिम षटकांमध्ये चौफेर फटकेबाजी करत संघाला गोड शेवट करून दिला. मलिकने १ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने नाबाद २६ तर अलीने ३ षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने नाबाद २७ धावा केल्या.
न्यूझीलंडकडून ईश सोढीने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तसेच टीम साउथीसाठीही आझमची एकमेव विकेट विक्रमी ठरली. या विकेटसह त्याने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील आपल्या १०० विकेट्स पूर्ण केल्या आहेत.
तत्पूर्वी न्यूझीलंडकडून प्रथम फलंदाजी करताना डॅरिल मिचेल आणि डेवॉन कॉन्वे यांनी प्रत्येकी २७ धावांचे योगदान दिले होते. तसेच कर्णधार केन विलियम्सननेही २५ धावा जोडल्या होत्या. परंतु पाकिस्तानी गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे इतर फलंदाजांचा टिकाव लागला नाही. मिचेल, कॉन्वे आणि विलियम्सनला वगळता न्यूझीलंडचा एकही फलंदाज २० धावांपर्यंतही मजल मारू शकला नाही.
पाकिस्तानकडून हॅरिस राऊफने सर्वाधिक ४ विकेट्स काढल्या. शाहिन आफ्रिदी, इमाद वसीम आणि मोहम्मद हाफिज यांनीही प्रत्येकी १ विकेट घेतली. हॅरिस राऊफला त्याच्या गोलंदाजी कामगिरीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या-
शमीच नव्हे ‘या’ दिग्गजालाही करावा लागलेला चाहत्यांच्या रोषाचा सामना, स्वत:ला घरामध्ये केले होते कैद
‘त्या’ अभिमानास्पद घटनेस समर्थन करण्यास डी कॉकचा नकार, बोर्डाकडून मोठ्या कारवाईची शक्यता
शाब्दिक युद्धापासून धक्काबुक्कीपर्यंत पोहोचलेल्या खेळाडूंनी मिटवला वाद, प्रशिक्षकांचा खुलासा