पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं रविवारी (27 ऑक्टोबर) एक मोठी घोषणा केली. पीसीबीनं यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानला वनडे आणि टी20 संघाचा कर्णधार बनवलं आहे. 32 वर्षीय रिझवान स्टार फलंदाज बाबर आझमची जागा घेईल.
बाबरनं नुकताच कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानला 2023 एकदिवसीय विश्वचषकात दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. यानंतर संघ 2024 टी20 विश्वचषकाच्या साखळी फेरीतूनच बाहेर पडला होता. संघाच्या या खराब कामगिरीनंतर बाबरनं आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितलं की ते संघाच्या मार्गदर्शकांशी बोलले. कोचिंग स्टाफ आणि टीमशी बोलल्यानंतर मोहम्मद रिझवानचं नाव पुढे आलं. सर्वांनी रिझवानवर विश्वास व्यक्त केला, ज्यानंतर त्याला ही जबाबदारी देण्यात आली. सलमान आगा संघाचा उपकर्णधार असेल.
मोहम्मद रिझवानची कर्णधार म्हणून पहिली जबाबदारी ऑस्ट्रेलिया दौरा असेल. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात तीन एकदिवसीय आणि तीन टी20 सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 4 नोव्हेंबर रोजी मेलबर्न येथे खेळला जाईल. यानंतर दुसरा सामना 8 नोव्हेंबरला ॲडलेडमध्ये आणि तिसरा सामना 10 नोव्हेंबरला पर्थमध्ये खेळला जाईल. 14 नोव्हेंबरपासून टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. ही मालिका 18 नोव्हेंबरपर्यंत चालेल.
मोहम्मद रिझवानकडे कर्णधारपदाचा फारसा अनुभव नाही. त्यानं अद्याप एकदिवसीय किंवा टी20 मध्ये राष्ट्रीय संघाचं नेतृत्व केलेलं नाही. मात्र त्यानं दोन कसोटी सामन्यांमध्ये कर्णधाराची भूमिका बजावली आहे. देशांतर्गत सामन्यांबद्दल बोलायचं झालं तर, रिझवानकडे कर्णधारपदाचा चांगला अनुभव आहे. तो मुलतान सुलतानचा कर्णधार राहिला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघ पाकिस्तान सुपर लीग 2021 मध्ये उपविजेता ठरला होता.
हेही वाचा –
39 वर्षीय खेळाडूचा जलवा, बनला रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू!
“रोहितनं कसोटीत टी20 ची मानसिकता सोडावी”, संजय मांजरेकरांचा हिटमॅनला सल्ला
टीम इंडियाला मिळाला नवा रन मशीन, फर्स्ट क्लास क्रिकेटमधील सरासरी डॉन ब्रॅडमनपेक्षाही जास्त!