पाकिस्तानात पुढील वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळली जाणार आहे. पीसीबीनं बऱ्याच दिवसांपासून या स्पर्धेच्या आयोजनाची तयारी सुरू केली आहे. मात्र ही स्पर्धा खेळण्यासाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाईल, याची शक्यता फारच कमी आहे. आता बातमी येत आहे की, चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारतीय संघ पाकिस्तानात न पाठवण्याचा निर्णय बीसीसीआयला महागात पडू शकतो. यासाठी पीसीबी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला न्यायालयात खेचू शकते.
वास्तविक, समोर आलेल्या काही रिपोर्ट्सनुसार, पीसीबी चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत क्रीडा लवादाच्या न्यायालयात खटला दाखल करण्याचा विचार करत आहे. भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अनेक दिवसांपासून खराब आहेत. या कारणास्तव दोन्ही देशांमध्ये गेल्या दशकभरापासून कोणतीही द्विपक्षीय मालिका झालेली नाही. महत्त्वाचं म्हणजे, 2008 पासून भारतीय संघानं पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. दोन्ही संघ केवळ आशिया चषक आणि आयसीसी स्पर्धांमध्येच आमनेसामने येतात.
पीसीबीनं बीसीसीआयला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात येण्यास अनेक आकर्षक ऑफर दिल्या होत्या. परंतु बीसीसीआय भारतीय खेळाडूंना कोणत्याही प्रकारच्या संकटात टाकू इच्छित नाही. खेळाडूंची सुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आयसीसीनं ही स्पर्धा हायब्रीड मॉडेल अंतर्गत आयोजित करावी अशी बीसीसीआयची इच्छा आहे. या मॉडेलद्वारे भारताचे सामने पाकिस्तानऐवजी यूएईमध्ये आयोजित केले जातील.
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड मात्र कोणत्याही परिस्थितीत हायब्रीड मॉडेलनुसार स्पर्धा आयोजित करू इच्छित नाही. पीसीबीचं म्हणणं आहे की, 2023 मध्ये जेव्हा भारतात एकदिवसीय विश्वचषक खेळला गेला, तेव्हा पाकिस्ताननं स्पर्धेत भाग घेण्यासाठी त्यांचा संघ पाठवला होता. अशा परिस्थितीत आता भारतीय संघानंही येथे यावं, अशी पीसीबीची इच्छा आहे.
मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर बीसीसीआयनं चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय टीम पाकिस्तानात पाठवली नाही, तर पीसीबी स्पोर्ट्स कोर्टात जाऊ शकते. Revsportz च्या अहवालानुसार, पीसीबीनं सांगितलं आहे की ते कायदेशीर पर्यायांवर विचार करत आहेत. त्याच वेळी, आयसीसीनं आधीच स्पष्ट केलं आहे की ते देशाच्या सरकारच्या निर्णयाच्या विरोधात जाण्यासाठी कोणत्याही क्रिकेट बोर्डावर दबाव आणू शकत नाहीत. आता पीसीबी या मुद्द्यावर कोर्टात जाते की नाही, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
हेही वाचा –
धोनीच्या संघातून खेळणार पंत? सीएसकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे मोठे वक्तव्य!
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताऐवजी हा देश खेळू शकतो? आयसीसी लवकरच घेणार मोठा निर्णय!
रोहितची सुट्टी, विराट होणार कर्णधार? बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीपूर्वी व्हायरल पोस्टरमुळे उडाली खळबळ