विश्वचषक 2023 स्पर्धेतील इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात पाकिस्तान संघाच्या हाती निराशा आली. इंग्लंडने पाकिस्तानचा 93 धावांनी दारुण पराभव केला. बाबर आझम याच्या नेतृत्वातील संघाने पराभवासह स्पर्धेचा निरोप घेतला. दुसरीकडे, या विजयासह जोस बटलर याच्या नेतृत्वातील इंग्लंडने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी क्वालिफाय केले. मात्र, या सामन्यातील दारुण पराभवानंतर बाबर आझमची प्रतिक्रिया सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 9 विकेट्स गमावत 337 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव 43.3 षटकात 244 धावांवरच संपुष्टात आला. या पराभवानंतर बाबर आझम (Babar Azam) जे म्हणाला, त्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
काय म्हणाला बाबर?
इंग्लंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना संघासाठी 38 धावांचे योगदान देणारा बाबर आझम पराभवानंतर खूपच निराश दिसला. तो म्हणाला की, “मी या पराभवानंतर खूपच निराश आहे. जर आ्मही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवण्यात यशस्वी झालो असतो, तर कदाचित आज चित्र वेगळे असते. मात्र, यामध्ये कोणतीही शंका नाही की, आम्ही गोलंदाजीच चुका केल्या. याव्यतिरिक्त फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही अपेक्षेनुसार, प्रदर्शन करू शकलो नाही. या सामन्यात आमच्या गोलंदाजांनी जवळपास 20-30 धावा अतिरिक्त दिल्या. तसेच, आमच्या गोलंदाजांनी सोपे चेंडू टाकले, ज्यावर इंग्लंडच्या फलंदाजांनी सहजरीत्या धावा केल्या.”
पुढे बोलताना बाबर असेही म्हणाला की, “आमचे फिरकीपटू विकेट घेऊ शकले नाहीत, ज्याचा मोठा परिणाम झाला. जर तुमचे फिरकीपटू मधल्या षटकात विकेट घेणार नसतील, तर तुमचा संघ संघर्ष करेल. आम्ही सोबत बसून प्रदर्शनावर चर्चा करू. आम्ही सकारात्मक गोष्टींवर लक्ष देऊ. आमच्या चुकांमधून शिकू.”
विश्वचषकात पाकिस्तानचा प्रवास संपला आहे. बाबर आजमच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघ उपांत्य सामन्यात प्रवेश करू शकला नाही. या विश्वचषकात पाकिस्तानने 9 सामने खेळले, त्यातील त्यांना फक्त 4 सामने जिंकण्यात यश आले. तसेच, उर्वरित 5 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. (Pakistan Cricketer babar azam reaction on pak vs eng world cup 2023)
हेही वाचा-
पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्यानंतर बटलरची लक्षवेधी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘आम्ही त्याच्याशिवाय…’
वेलडन विली! अखेरच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात बनला सामनावीर, शानदार राहिली कारकीर्द