क्रिकेटमध्ये ज्याप्रकारे फलंदाजी, गोलंदाजी महत्त्वपूर्ण असते त्याच प्रकारे क्षेत्ररक्षण व यष्टीरक्षण यांना सुद्धा तितकेच महत्त्व आहे. भारतीय क्रिकेटमध्ये जनार्दन नवले यांच्यापासून सुरू झालेली यष्टीरक्षकांची यादी आजतागायत रिषभ पंतपर्यंत आली आहे. मधल्या काळात फारूक इंजिनियर, सय्यद किरमाणी, किरण मोरे, एमएस धोनी यांनी यष्टिरक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नाव कमवले. त्याचपैकी एक असलेले किरण मोरे यांचा आज वाढदिवस.
४ सप्टेंबर १९६२ मध्ये बडोद्यातील एका सधन कुटुंबात त्यांचा जन्म झाला. लहानपणापासून क्रिकेटची प्रचंड आवड असल्याने ते नियमितपणे क्रिकेटचा सराव करत. फलंदाजीसोबतच त्यांनी यष्टीरक्षण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी चांगल्या यष्टिरक्षकांची वानवा असल्याने, मोरे यांना चांगल्या कामगिरीमुळे लवकर लवकर संध्या मिळू लागल्या. १९७७ मध्ये त्यांची भारतीय युवा संघात निवड झाली. ते मुंबईतील टाईम्स शिल्डमधील टाटा स्पोर्ट्स क्लबकडून आणि १९८२ मध्ये नॉर्थ लँकशायर लीगमधील बॅरो संघाकडून खेळले.
१९८२-८३ वेस्टइंडीज दौऱ्यावर राखीव यष्टिरक्षक म्हणून त्यांची भारतीय संघात निवड झाली. मात्र, पहिल्या पसंतीचे यष्टीरक्षक सय्यद किरमाणी यांच्यामुळे त्यांना संधी मिळू शकली नाही. संपूर्ण दौर्यावर एकही सामना न खेळता ते मायदेशी परतले. किरण मोरे त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट १९८२-८३ ची रणजी ट्रॉफी स्पर्धा ठरली. सलग दोन सामन्यात नाबाद १५३ व नाबाद १८१ धावांच्या खेळ्या करत त्यांनी बडोदा संघाला उपांत्य फेरीपर्यंत नेले.
१९८४ मध्ये त्यांनी एकदिवसीय पदार्पण केले मात्र, त्या मालिकेत ते सपशेल अपयशी ठरले. त्या मालिकेत दुर्दैवाने ते एकही झेल घेऊ शकले नाहीत तसेच फलंदाजी करण्याची संधी त्यांना मिळाली नाही. त्यानंतर त्यांना संघातून वगळण्यात आले. वर्षभर ते संघाच्या बाहेर होते.
मोरे यांनी आपल्या यष्टीरक्षण व फलंदाजीने १९८६ चा इंग्लंड दौरा गाजवला. या दौऱ्यात त्यांनी आपले कसोटी पदार्पण केले होते. यष्टिरक्षक म्हणून १६ झेल व फलंदाजी करताना ५२ च्या सरासरीने १५६ धावा काढल्या. त्यांची सरासरी संपूर्ण मालिकेत दुसऱ्या क्रमांकाची सरासरी होती.
किरण मोरे यांनी १९८८ च्या ऐतिहासिक चेन्नई कसोटीत ६ खेळाडू यष्टीचीत करण्याचा विश्वविक्रम केला होता. याच कसोटीत नरेंद्र हिरवाणी यांनी पदार्पण करत १६ बळी आपल्या नावे केले होते. तसेच, रवी शास्त्री यांचा कर्णधार म्हणून तो एकमेव सामना होता.
किरण मोरे यांच्या आयुष्यातील सर्वात महागात पडलेली चूक म्हणजे ग्रॅहम गूच यांचा सोडलेला झेल. १९९० च्या इंग्लंड दौऱ्यावर, लॉर्ड्स कसोटी दरम्यान किरण मोरे यांनी संजीव शर्मा यांच्या गोलंदाजीवर ग्रॅहम गूच यांचा ३६ धावांवर सोपा झेल सोडला होता. त्याच डावात गूच यांनी वैयक्तिक ३३३ धावसंख्या उभारली. पुढे तो सामना इंग्लंडने २४७ धावांनी जिंकला.
किरण मोरे यांच्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय क्षण म्हणजे १९९२ च्या विश्वचषकात जावेद मियांदाद यांच्याशी त्यांचा झालेला वाद. किरण मोरे यांच्या यष्ट्यांमागून होणाऱ्या सततच्या बडबडीने वैतागलेल्या मियांदाद यांनी मोरे यांच्यासमोर जाऊन माकडउड्या मारल्या होत्या. आजही भारत-पाकिस्तान यांच्या दरम्यान कोणताही सामना असेल तर या घटनेचा हमखास उल्लेख होतो.
१९९७ मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर मोरे यांनी बडोदा येथे स्वतःची क्रिकेट अकादमी स्थापन केली. सध्या भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवत असलेले कृणाल व हार्दिक हे पांड्या बंधू किरण मोरे यांनीच शोधलेले हिरे आहेत. पांड्या बंधूंची आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही मोरे यांनी त्या दोघांना मोफत क्रिकेट प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. दोघांमधील प्रतिभा ओळखत मोरे यांनी पांड्या बंधूंना मोठ-मोठ्या स्पर्धात संधी दिली. आजही, हार्दिक व कृणाल किरण मोरे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतात.
मोरे २००२ ते २००६ या काळात भारतीय क्रिकेट संघाच्या निवडसमितीचे अध्यक्ष राहिले. गांगुली-चॅपल वादावेळी मोरे यांनी गांगुलीला संघाबाहेर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे त्यांना प्रसारमाध्यमे व क्रिकेटचा त्यांचा रोष ओढावून घ्यावा लागला होता.
मोरे यांनी एका वर्षानंतर अजून एका मोठ्या वादाला आमंत्रण दिले. २००७ मध्ये बंडखोर इंडियन क्रिकेट लीगमध्ये कार्यकारी संचालक म्हणून ते सामील झाले. त्यानंतर बीसीसीआयने किरण मोरे आणि कपिल देव यांच्यासह काही जणांवर बंदी घातली.
२०१६ मध्ये भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याच्या जीवनावर तयार करण्यात आलेल्या “एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी” या चित्रपटासाठी धोनीची भूमिका करणारा दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याला प्रशिक्षण देण्याचे काम मोरे यांनी केले होते. याचसोबत त्या चित्रपटात छोटीशी भूमिका त्यांनी केली होती.
सध्या ते बडोदा येथे स्वतःची क्रिकेट अकादमी चालवतात. तसेच मुंबई इंडियन्ससाठी युवा खेळाडू शोधण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे.
हेही वाचा-
वाढदिवस विशेष: क्रिकेटच्या डिक्शनरीमध्ये ‘फिनिशर’ शब्दाची परिभाषा बदलणारा लान्स क्लुसनर