8 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होण्यासाठी पाकिस्तानचा हॉकी संघ चीनमध्ये पोहोचला आहे. मात्र या टूर्नामेंटमध्ये सहभागी होण्यासाठी पाकिस्तान संघानं चक्क कर्ज काढून विमानाचं तिकीट घेतल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आलाय. ही बातमी समोर आल्यानंतर पाकिस्तानच्या आर्थिक हलाखीचा अंदाज लावता येऊ शकतो.
‘फ्री प्रेस जर्नल’मधील एका अहवालात दावा करण्यात आला आहे की, पाकिस्तान हॉकी संघानं आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 साठी चीनला जाण्यासाठी विमानाची तिकिटं उधार घेतली आहेत. ही बातमी समोर आल्यानंतर पाकिस्तान हॉकी फेडरेशनला चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं.
पाकिस्तान हॉकी फेडरेशनचे (पीएचएफ) अध्यक्ष तारिक बुगती यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं की, लवकरच पैसे मिळण्याची अपेक्षा आहे. इतकेच नाही तर तारिक बुगती यांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना हॉकीसाठी समर्पित आर्थिक निधी देण्याचं आवाहनही केलं. दुसरीकडे, पाकिस्तान क्रीडा मंडळानं विमानाच्या तिकिटांचे पैसे लवकरच दिले जातील, असं म्हटलं आहे. खेळाडूंच्या प्रवासासाठी एकूण बजेट 2.50 कोटी पाकिस्तानी रुपये आहे. यामध्ये हवाई तिकीट, व्हिसा शुल्क आणि हॉटेलच्या खर्चाचा समावेश आहे.
‘फ्री प्रेस जर्नल’नं आपल्या अहवालात दावा केला आहे की, यापूर्वी पाकिस्तान क्रीडा मंडळानं 18 वर्षाखालील बेसबॉल संघाला देखील निधी देण्यास नकार दिला होता. त्याचवेळी पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पाकिस्तानसाठी सुवर्णपदक जिंकणाऱ्या अर्शद नदीमला पाकिस्तान क्रीडा मंडळाकडून पाठिंबा मिळत नव्हता. यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं त्याला पाठिंबा दिला आणि नदीमनं ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला.
पाकिस्तानमध्ये हॉकीचा इतिहास फार जुना आहे. 1960 च्या रोम ऑलिम्पिकमध्ये पाकिस्ताननं हॉकीमध्ये पहिलं सुवर्णपदक जिंकलं होतं. त्यानंतर हॉकीला पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ घोषित करण्यात आलं. ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकून पाकिस्तान संघ देशात परतला तेव्हा तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जनरल अयुब खान यांनी कराचीमध्ये चॅम्पियन संघाचं स्वागत केलं होते. त्यावेळी त्यांनी हॉकीला पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ म्हणून घोषित केलं.
हेही वाचा –
लज्जास्पद! विदेशात खेळायला गेलेले 3 पाकिस्तानी खेळाडू मायदेशी परतलेच नाहीत
आयपीएल 2025 : 3 मोठे खेळाडू, ज्यानं रिटेन करणं संघांना पडू शकतं महागात
दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूनं उडवली सूर्यकुमार यादवच्या कॅचची खिल्ली; म्हणाला, “जर वर्ल्ड कप फायनलमध्ये….”