आशिया चषक 2023 स्पर्धेत यजमानपद भूषवणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट संघाला वाईटरीत्या सुपर-4मधून बाहेर पडावे लागले होते. त्यानंतर अंतिम सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेचा दारुण पराभव करत स्पर्धेचा किताब आपल्या नावावर केला. आता आशिया चषकातील पराभवाबद्दल पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोईन खान याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटले आहे की, असे वाटते, जसे पाकिस्तानी खेळाडू घाबरले होते. कारण, कर्णधार बाबर आझमला कोणताही खेळाडू जाऊन सल्ला देत नव्हता. तो म्हणाला की, भारताविरुद्ध खेळताना पाकिस्तानी खेळाडूंच्या मनात भीती असते.
‘घाबरला तर डोकं चालणार नाही’
मोईन खान (Moin Khan) याच्यानुसार, भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानी खेळाडू खूपच घाबरले होते. त्यांनी क्रिकेट पाकिस्तानशी बोलताना म्हटले, “मी 100 टक्के खेळाडूंमध्ये ही गोष्ट पाहिली आहे. खेळाडू घाबरल्याचे दिसत होते. एवढंच नाही, तर कर्णधार बाबर आझम याला कोणीही सल्ला देत नव्हता. मग तो रिझवान असो, शादाब खान असो किंवा शाहीन आफ्रिदी असो.”
“हे स्पष्ट दिसत होते की, संघ आपसात एकजुट नाहीये. कोणीही आपसात चर्चा करत नव्हते. जरी होत असली, तरीही ते त्यानुसार वागत नव्हते. जर वागत असते, तर त्याचा निकाल येत नव्हता. एक गोष्ट आहे की, भारताविरुद्ध खेळाडू घाबरतात. जो खेळाडू घाबरला, त्याचा सल्ला कामी येणार नाही,” असेही तो पुढे म्हणाला.
भारत-पाकिस्तान सामना
आशिया चषक 2023 स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानला 228 धावांनी धोबीपछाड दिला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित 50 षटकात 2 विकेट्स गमावत 356 धावा केल्या होत्या. मात्र, आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाचा डाव 128 धावांवरच संपुष्टात आला. त्यामुळे त्यांना वाईटरीत्या पराभवाचा सामना करावा लागला होता. भारतीय संघाच्या या विजयात विराट कोहली याचे मोठे योगदान होते. विराटने या सामन्यात धुव्वाधार शतकी खेळी साकारली होती. त्याने या खेळीत 94 चेंडूंचा सामना केला होता. यावेळी त्याने 3 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने नाबाद 122 धावांची झंझावाती खेळी साकारली होती. तसेच, संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले होते. विराटव्यतिरिक्त केएल राहुल यानेही नाबाद 111 धावांची शतकी खेळी साकारली होती. (pakistan players get scared vs india says former pakistan cricketer moin khan)
हेही वाचा-
‘या’ दोघांना विश्वचषकात संधी मिळणं खूपच कठीण, सेहवागने नावासहित कारणही टाकलं सांगून
अश्विनने भारतीय संघाला दिला विजयाचा मंत्र; म्हणाला, ‘तुम्ही दवाबात…’