टी-२० विश्वचषक स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. प्रत्येक संघ या स्पर्धेच्या जोरदार तयारीला लागला आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघाने आपला १५ सदस्यीय संघ देखील या स्पर्धेसाठी जाहीर केला आहे. प्रत्येक देशातील खेळाडू आपल्या संघाकडून खेळण्यासाठी उत्सुक आहे.
दरम्यान, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम देखील येणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या तयारीला लागला आहे. मात्र बाबरसमोर एक दुविधा आहे. ती म्हणजे, बाबरला पाकिस्तानचा वरिष्ठ आणि अनुभवी खेळाडू शोएब मलिकला टी-२० संघात सामील करायचे आहे. मात्र पाकिस्तान संघाचे मुख्य निवडकर्ते मोहम्मद वसीम यांनी या गोष्टीकडे जास्त लक्ष दिले नाही. मलिककडे टी-२० चा भरपूर अनुभव आहे. त्यामुळे येणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तानला मलिकच्या अनुभवाचा फायदा होऊ शकतो.
क्रिकेट पाकिस्तानच्या एका बातमीनुसारबाबर आजमने शोएब मलिकला एक संधी देण्याची मागणी केली आहे. मात्र निवडकर्ते वसीमकडून याबाबत बाबरला योग्य प्रतिक्रिया मिळाली नाही. एका सूत्रानुसार वसीम यांच्या मते “मलिकचे वय ३९ झाले असल्यामुळे, तो आता टी-२० सारख्या खेळासाठी संघात स्थान मिळवण्यासाठी योग्य नाही.”
३९ वर्षीय शोएब मलिकने सप्टेंबर २०२० पासून पाकिस्तानकडून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. असे असले तरी, मलिक चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने पाकिस्तान सुपर लीगच्या (पीएसएल) ६ व्या हंगामात एकूण ३५४ धावा केल्या आहेत. यासह या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्यामध्ये तो ४ थ्या क्रमांकाचा फलंदाज होता. तसेच नुकत्याच झालेल्या काश्मीर प्रीमियर लीग या स्पर्धेत देखील त्याने ७ सामन्यात २४० धावा केल्या होत्या. दरम्यान ४० वर्षे मोहम्मद हाफिज सध्या खराब फॉर्मशी झगडत आहे. असे असले तरी त्याला पाकिस्तानच्या टी-२० संघात नियमित संधी मिळत आहे.
शोएब मलिक पाकिस्तानच्या सर्वात वरिष्ठ खेळाडूंपैकी एक आहे. त्याने ११६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३१ च्या सरासरीने २३३५ धावा केल्या आहेत. ज्यात त्याने ८ अर्धशतक देखील लगावले आहेत. त्याचबरोबर पाकिस्तानकडून टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. मलिकने २८ विकेट्स देखील घेतलेल्या आहेत.
तसेच त्याने आतापर्यंत ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमध्ये एकूण ४२५ सामने खेळले आहेत, ज्यात त्याने ३७ च्या सरासरीने १०,७४१ धावा केल्या आहेत. ज्यात ६६ अर्धशतकांचा देखील समावेश आहे. तसेच त्याने १५२ विकेट देखील घेतल्या आहेत.
शोएब मलिकने पाकिस्तानकडून खेळताना आतापर्यंत ३५ कसोटी सामने आणि २८७ एकदिवसीय सामने खेळले आहेत. कसोटी सामन्यांमध्ये ३ शतक आणि ८ अर्धशतकांचा मदतीने मलिकने १८९८ धावा केल्या आहेत. तसेच ३२ विकेट देखील घेतले आहे. तर एकदिवसीय सामन्यांमध्ये ३५ च्या सरासरीने ७५३४ धावा केल्या आहे. ज्यात ९ शतक आणि ४४ अर्धशतके त्याने लगावले आहेत. त्याचबरोबर १५८ विकेट देखील घेतलेले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
–ऐकलंत का! गंभीर म्हणतोय, “भारत पाकिस्तानपेक्षा मजबूत, पण अफगानिस्तानपासून आहे धोका”
–बीसीसीआयच्या ‘या’ घोषणेने आयपीएल फ्रँचयाझींची वाढवली चिंता, एकटी सीएसके मात्र निश्चिंत
–‘सचिन अन् द्रविडच्या पावलावर पाऊल ठेवत कोहली पुढे जातोय,’ विरोधी संघातून कौतुक