नेदरलँड्सविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने मंगळवारी १६ धावांनी विजय नोंदवला. सलामीवीर फखर जमानच्या शतकी खेळीमुळे पाकिस्तानने निर्धारित ५० षटकांत ६ बाद ३१४ धावा केल्या. यानंतर कर्णधार स्कॉट एडवर्ड्सच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर नेदरलँड्सने २९८ धावा केल्या मात्र लक्ष्यापासून दूर राहिला. या विजयासह पाकिस्तानने ३ सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता दुसरा एकदिवसीय सामना १८ ऑगस्ट रोजी रॉटरडॅमच्या या मैदानावर खेळवला जाईल.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाहुण्या संघाला १० धावांवर सुरुवातीचा धक्का बसला, जेव्हा इमाम-उल-हकला किंग्माने एलबीडब्ल्यू आऊट झाला. यानंतर फखर जमान आणि बाबर यांनी दुसऱ्या विकेटसाठी १६८ धावांची भागीदारी रचली. बाबरने ८५ चेंडूत ७४ धावांच्या खेळीत ६ चौकार आणि १ षटकार लगावला. त्याचवेळी १०९ चेंडूत १०९ धावा करताना फखरने १२ चौकार आणि १ षटकार लगावला. फखरला त्याच्या या खेळीसाठी सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले. शिवाय शादाब खान ४८ धावा करून नाबाद परतला. त्याने २८ चेंडूंच्या तुफानी खेळीत ४ चौकार आणि २ षटकार ठोकले. तसेच सलमानने १६ चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने नाबाद २७ धावांचे योगदान दिले. नेदरलँड्सकडून बैस डी लीड आणि व्हॅन बीकने प्रत्येकी २ तर किंग्माने १ बळी घेतला.
३१५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या नेदरलँडची सुरुवात चांगली झाली नाही आणि त्यांच्या ३ विकेट ६२ धावांवर पडल्या. सलामीवीर विक्रमजीत सिंग एका टोकाने चांगली खेळा केली आणि त्याने टॉम कूपर सोबत चौथ्या विकेटसाठी ९७ धावा जोडल्या. टॉमने ५४ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकार ठोकले तर विक्रमजीतने ९८ चेंडूंच्या संयमी खेळीत ५ चौकार लगावले. यानंतर कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने संघाला लक्ष्यापर्यंत नेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, संघाला तीनशेचा टप्पा ओलांडता आला नाही. स्कॉट ६० चेंडूत ६ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने नाबाद ७१ धावा करून परतला. पाकिस्तानकडून हरिस रौफ आणि नसीम शाह यांनी ३-३ तर मोहम्मद वसीम जूनियर आणि मोहम्मद नवाज यांनी १-१ बळी घेतला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जोहान्सबर्गचे पहिले पाच ‘सुपरकिंग्स’ जाहीर; दिसतेय ‘मिनी सीएसके’
कॅप्टन्सी गमावल्यानंतर प्रथमच बोलला शिखर; म्हणाला, “राहुल हा…”
अल्टीमेट खो-खो स्पर्धेत आदर्श मोहितेची चमकदार कामगिरी, तेलगु योद्धाज संघांचा सलग दुसरा विजय





