पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान रावलपिंडी येथे नुकत्याच पार पडलेल्या कसोटी सामन्यात दोन्ही संघांकडून जबरदस्त खेळ बघायला मिळाला. मात्र महत्वाच्या क्षणी भेदक गोलंदाजी करत पाकिस्तानने शानदार विजय मिळवला. यासह पाकिस्तानने दोन कसोटी सामन्यांची मालिका २-० च्या फरकाने खिशात घातली.
वेगवान गोलंदाज हसन अली पाकिस्तानच्या या विजयाचा नायक ठरला. हसनने दोन्ही डावात 5-5 बळी मिळवत दक्षिण आफ्रिकेच्या डावाला खिंडार पाडले. त्यालाच सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
आफ्रिकन फलंदाजांची हाराकिरी
सामन्याच्या पाचव्या दिवशी दक्षिण आफ्रिकेला आपल्या फलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. 370 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने अपेक्षेप्रमाणेच उत्तम सलामी केली. सलामीवीर एडन मार्क्रमने 108 धावांची शानदार खेळी करत दक्षिण आफ्रिकेच्या आशा जिवंत ठेवल्या. मात्र दुसऱ्या टोकाकडून त्याला अपेक्षित साथ मिळाली नाही.
हसन अलीने महत्वाच्या क्षणी दक्षिण आफ्रिकेला धक्के देत पाकिस्तानला 95 धावांनी विजय मिळवून दिला. हसनने 16 षटकात 60 धावा देत 5 बळी मिळवले. विशेष म्हणजे हसनने पहिल्या डावातही शानदार कामगिरी केली होती. हसनने पहिल्या डावात 15.4 षटकात 54 धावा देत 5 बळी मिळवले होते.
सामना झाला चुरशीचा
तत्पूर्वी पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानने पहिल्या डावात 272 धावा केल्या होत्या. त्यानंतर प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 201 धावांवर रोखला. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांनी पुनरागमन करत यजमानांना २९८ धावांवरच रोखले.
त्यामुळे चौथ्या डावात पाहुण्या संघाला ३७० धावांचे लक्ष्य मिळाले होते. चौथ्या दिवसाच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेने १ बाद १२७ धावांची मजल मारली होती. त्यामुळे सामन्यात चुरस निर्माण झाली होती. परंतु पाकिस्तानने शिस्तबद्ध गोलंदाजी करताना विजय निश्चित केला.
महत्वाच्या बातम्या:
शंभराव्या कसोटीत इंग्लंडच्या संघनायकाचा दे घुमा के! चोपल्या २५० हून अधिक धावा
लॉरेन्सला बाद करत इशांतने पूर्ण केल्या ३०० कसोटी विकेट्स, पण या बाबतीत पडला मागे