पाकिस्तान क्रिकेट संघाला टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत खेळलेल्या दोन्ही सामन्यात अपयश आले. त्यांना आधी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि नंतर झिम्बाब्वे संघाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तानच्या लाजीरवाण्या पराभवानंतर त्यांचा कर्णधार बाबर आझम याच्यावर चोहोबाजूंनी प्रश्नांचा भडीमार होत आहे. अशात माजी यष्टीरक्षक फलंदाज कामरान अकमल यानेही त्याच्यावर टीकेची तोफ डागली आहे. त्याने म्हटले की, टी20 विश्वचषकानंतर बाबरने कर्णधारपद सोडले पाहिजे.
कामरान अकमल (Kamran Akmal) याने बाबर आझम (Babar Azam) याच्यावर जोरदार टीका केली आणि म्हटले की, त्याने आता कर्णदारपद सोडले पाहिजे. कारण, त्याच्यावर सध्या दबाव आहे आणि तो दबावात चांगल्याप्रकारे फलंदाजी करू शकत नाही. अकमलनुसार, बाबरने फक्त त्याच्या फलंदाजीवर लक्ष दिले पाहिजे.
‘बाबर आझमने फक्त एक खेळाडू म्हणून खेळावे’
माध्यमांशी बोलताना तो म्हणाला की, “मोठ्या भावाच्या नात्याने जर बाबर आझम मला काही समजत असेल, पीसीबी माझ्या मताचा आदर असेल, तर बाबर आझमने या टी20 विश्वचषकानंतर नेतृत्व केले नाही पाहिजे. बाबरला 22 हजार किंवा 25 हजार आंतरराष्ट्रीय धावा करायच्या असतील, तर त्याने कर्णधारपद सोडले पाहिजे. त्याने एक खेळाडू म्हणून खेळले पाहिजे. कारण, दबावात येऊन तो चांगली कामगिरी करू शकत नाहीये. त्याला माझे बोलणे पटत असेल, तर त्याने कर्णधारपद सोडले पाहिजे आणि विराट कोहली (Virat Kohli) याच्यासारखे फलंदाजीवर लक्ष दिले पाहिजे. पाकिस्तानला त्याची गरज आहे. कारण त्याच्याव्यतिरिक्त इतर कोणताही मोठा फलंदाज दिसत नाहीये. बाबर कर्णधार बनून राहिला, तर संघाचे खूप नुकसान होईल.”
दुसरीकडे, कामरान अकमल याने यापूर्वीही एक हैराण करणारा खुलासा केला होता. त्याने म्हटले होते की, जेव्हा बाबर आझमला कर्णधार बनवण्याची चर्चा सुरू होती, तेव्हा त्याने नकार दिला होता की, बाबरने आताच नेतृत्व करू नये. त्याने एक खेळाडू म्हणून सातत्याने कामगिरी केली असती आणि तो आता कर्णधार बनला असता, तर गोष्ट वेगळी होती.
अकमलपूर्वी पाकिस्तानचा माजी कर्णधार सलीम मलिक यानेही बाबर आझमवर टीका केली. त्याने म्हटले की, “बाबर आझम वारंवार एकच चूक करतोय. त्यामुळे त्याने कर्णधारपद सोडावे.”
आता एवढ्या सर्व टीकांचा परिणाम बाबरवर होतो का आणि तो कर्णधारपद सोडून त्याच्या फलंदाजीवर लक्ष देतो का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
न्यूझीलंडचा विश्वचषकातील दुसरा विजय, श्रीलंकेला हरवताच विलियम्सन झाला भलताच खुश
विरोधी संघाला पुरून उरला फिलिप्स; बनला ‘अशी’ कामगिरी करणारा टी20 विश्वचषकातील तिसराच खेळाडू