भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा विवाह नोव्हेंबर 2025 मध्ये होणार होता. मात्र ऐन लग्नाआधी हा विवाह रद्द झाल्याची घोषणा डिसेंबरमध्ये दोघांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून केली होती. त्या वेळी दोघांनीही वैयक्तिक आयुष्याबाबत गोपनीयता राखण्याची विनंती करत यावर अधिक भाष्य टाळले होते. मात्र आता या प्रकरणाला नवे आणि वादग्रस्त वळण मिळाले आहे.
स्मृती मानधनाचा जवळचा मित्र असल्याचा दावा करणाऱ्या विज्ञान माने याने पलाश मुच्छलवर गंभीर आरोप केले असून, लग्न तुटण्यामागील कथित कारण त्याने सार्वजनिक केले आहे. विज्ञान मानेने माध्यमांशी बोलताना सांगितले की, तो स्वतः लग्नाच्या तयारीदरम्यान एका कार्यक्रमाला उपस्थित होता. त्यावेळी पलाश मुच्छल याला एका महिलेसोबत बेडवर रंगेहात पकडण्यात आल्याचा दावा त्याने केला आहे.
मानेच्या म्हणण्यानुसार, या घटनेनंतर दोन्ही कुटुंबांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला. परिस्थिती इतकी बिघडली की, कथितरित्या भारतीय महिला क्रिकेट संघातील काही खेळाडूंनी पलाशवर हात उचलल्याचा आरोपही करण्यात आला आहे. “तो प्रसंग अत्यंत धक्कादायक आणि अस्वस्थ करणारा होता. संपूर्ण वातावरण संतापाने भरलेले होते,” असे माने याने सांगितले.
याशिवाय विज्ञान माने याने पलाश मुच्छल याच्यावर आर्थिक फसवणुकीचे आरोपही केले आहेत. त्याच्या दाव्यानुसार, पलाशने एका चित्रपट प्रकल्पासाठी त्याच्याकडून सुमारे 40 लाख रुपयांची गुंतवणूक घेतली होती. सहा महिन्यांत चित्रपट पूर्ण होईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र ना चित्रपट तयार झाला, ना गुंतवणूक परत मिळाली, असा आरोप माने यांने केला आहे. लग्न रद्द झाल्यानंतर पलाशने संपर्क तोडल्याचाही दावा त्याने केला आहे.
दरम्यान, स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचा विवाह 23 नोव्हेंबर 2025 रोजी सांगली येथे होणार होता. मात्र स्मृतींचे वडील श्रीनिवास मानधना यांना अचानक प्रकृती अस्वस्थ झाल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्यानंतर पलाशही आजारी पडल्याने लग्न पुढे ढकलण्यात आले. काही दिवसांतच स्मृतीने अधिकृतपणे लग्न रद्द करण्याची घोषणा केली होती.






