ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडिया मोहम्मद शमीला खूप मिस करेल, असं माजी भारतीय गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांना वाटतं. शमीला 2023 विश्वचषकादरम्यान दुखापत झाली होती. त्यानंतर तो जवळपास एक वर्ष क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. अलीकडेच शमी रणजी ट्रॉफीसह स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतला. परंतु तो 22 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत उपलब्ध होणार की नाही, याबाबत अद्याप काहीही स्पष्टता नाही.
याशिवाय जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियात सर्व पाच कसोटी सामने खेळू शकणार नाही, असंही पारस म्हणाले. भारतीय क्रिकेट संघाला 22 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळायची आहे. यंदा मालिकेत चार ऐवजी पाच कसोटी सामने खेळले जात आहेत.
‘हिंदुस्तान टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत पारस यांना विचारण्यात आलं की, मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीमुळे टीम इंडियाचं नुकसान होणार का? यावर त्यांनी उत्तर दिलं, “शमीच्या अनुभवाचा विचार करता, आपल्याकडे मोठ्या एक्स-फॅक्टरची कमतरता आहे. तुम्हाला शमीसारख्या खेळाडूची नेहमीच उणीव भासेल. तो ज्या प्रकारची कौशल्यं संघात आणतो, तो अनुभव त्याच्याकडे आहे. साहजिकच शमी आणि जसप्रीत बुमराह एकत्र आले की धोकादायक जोडी बनते. भारताला शमीची खूप आठवण येणार आहे. पण त्याची दुसरी बाजू पाहिली तर ज्या खेळाडूंना संधी मिळत आहे, त्यांच्यासाठीही ही चांगली गोष्ट आहे. इतर खेळाडूंना आपली ताकद दाखवण्याची संधी मिळेल.
जेव्हा पारस म्हांब्रे यांना विचारलं की, या मालिकेत जसप्रीत बुमराहचा वर्कलोड कसा हाताळला जाईल? तेव्हा ते म्हणाले, “साधारणपणे, वर्कलोड मॅनेजमेंटकडे केवळ या मालिकेतच पाहिलं जात नाही. इंग्लंडमध्येही बुमराहला एका कसोटी सामन्याला मुकावं लागले होतं. इथे मुद्दा असा आहे की तुम्ही त्याला कधी विश्रांती देण्याचं ठरवता? या मालिकेकडे पाहता ही 5 कसोटी सामन्यांची मालिका महत्त्वाची ठरणार आहे. तो ज्या पद्धतीनं गोलंदाजी करतो, मला वाटत नाही की तो पाचही सामने खेळेल. तो कोणत्या कसोटी सामन्यात विश्रांती घेण्याचा निर्णय घेतो हे आव्हान असेल. हे मालिका कशी जाते यावर अवलंबून असेल. मात्र तुम्हाला त्याला ब्रेक द्यावाच लागेल.”
हेही वाचा –
“जग काय मुर्ख आहे…” चॅम्पियन्स ट्राॅफी वादावर माजी पाकिस्तान खेळाडूचे मोठे वक्तव्य!
आयसीसीचा पाकिस्तानला मोठा झटका! चॅम्पियन्स ट्रॉफीचा पीओकेतील दौरा रद्द
“पाकिस्तानात खूप दहशतवाद….”, बीसीसीआयनं आयसीसीला स्पष्टच सांगितलं!