स्टार भारतीय नेमबाज मनू भाकर ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचण्याच्या अगदी जवळ आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं पदक मिळवून देणारी मनू आता दुसरं पदक जिंकून एक मोठा विक्रम रचू शकते, जो आजपर्यंत कोणीही केलेला नाही. मनूनं रविवारी 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदक जिंकलं होतं. आता ती 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत सरबज्योत सिंगसोबत सहभागी होत आहे.
मनू आणि सरबज्योत यांच्या जोडीनं 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदकाच्या लढतीत प्रवेश केला आहे. आज, मंगळवार, 30 जुलै रोजी दुपारी 1 वाजता या जोडीचा सामना कोरियाच्या ली वोंहो आणि ओ ये जिन या जोडीशी होईल. हा सामना जिंकताच मनू पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आणखी एक पदक आपल्या नावावर करेल.
जर मनू भाकर आणि सरबज्योत सिंग या जोडीनं 10 मीटर एअर पिस्तुल मिश्र स्पर्धेत कांस्यपदक जिंकलं, तर मनू एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू बनेल. आतापर्यंत एका ऑलिम्पिकमध्ये एकाही भारतीय खेळाडूनं दोन पदकं जिंकलेली नाहीत. मात्र दोन वेगवेगळ्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारे 2 भारतीय खेळाडू आहेत.
सर्वप्रथम कुस्तीपटू सुशील कुमारनं 2008 बिजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकलं होतं. यानंतर त्यानं 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक आपल्या नावे केलं. याशिवाय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनं 2 ऑलिम्पिक मेडल जिंकले आहेत. सिंधूनं 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य आणि 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकलं होतं.
मनू भाकरनं 28 जुलै रोजी 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कांस्यपदक जिंकलं होते. या पदकासह भारतासाठी नेमबाजीत पदक जिंकणारी ती पहिली महिला ठरली. आता मनूकडे एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकून इतिहास रचण्याची संधी आहे. आता दुसऱ्या पदकाच्या लढतीत ती कशी कामगिरी करते हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.
हेही वाचा –
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनिका बत्रानं रचला इतिहास, यजमान फ्रान्सच्या खेळाडूला हरवून केला मोठा उलटफेर
पॅरिस ऑलिम्पिक 2024 : भारत-अर्जेंटिना सामना सुटला बरोबरीत, शेवटच्या क्षणी हरमनप्रीतची चमकदार कामगिरी
पॅरिस ऑलिम्पिक: अर्जुन बबुताचा निशाना थोडक्यात चुकला..! एअर रायफलमध्ये गमावलं पदक