सध्या जारी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एक मोठा वाद निर्माण झाला आहे. खेळाडूंना देण्यात येणाऱ्या पदकांचा रंग निघून चालला आहे. ब्रिटनची ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती यास्मिन हार्परनं दावा केला आहे की, तिच्या पदकाचा रंग निघू लागला आहे. तिला महिलांच्या 100 मीटर सिंक्रोनाइझ स्प्रिंगबोर्ड स्पर्धेत हे पदक मिळालं होतं. अमेरिकेच्या स्केटबोर्ड टीमच्या सदस्यानंही अशीच तक्रार केली आहे. आपल्या कांस्यपदकाचा रंग फिका पडत असून तो मागच्या बाजूला तुटल्याचंही त्यानं सांगितलं.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये एकापाठोपाठ एक वाद होत आहेत. यापूर्वी महिला बॉक्सिंगमध्ये दोन खेळाडूंच्या लिंगावरून वाद झाला होता. सध्या विनेश फोगटच्या अपात्रतेवरून वाद सुरू आहे. याशिवाय पॅराग्वेच्या एका जलतरणपटूला ऑलिम्पिक व्हिलेजमधून बाहेर काढण्यात आलंय.
आता पदकासंबंधी ही बातमी आली आहे. पदकं हे खेळाडूंच्या अनेक वर्षांच्या मेहनतीचं आणि समर्पणाचं प्रतीक मानले जातात. अशा स्थितीत खराब पदक मिळणं निराशाजनक आहे. या प्रकरणामुळे पॅरिस ऑलिम्पिक आयोजकांच्या विश्वासार्हतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.
“हे थोडं निराशाजनक आहे, कारण ते (पदक) फक्त एक आठवडा चमकत होतं,” असं यास्मिन हार्पर म्हणाली. मात्र हे कांस्यपदक असून त्याचं स्वत:चं महत्त्व असल्यानं यामुळे मला फारसा फरक पडला नसल्याचंही तिनं सांगितलं. दुसरीकडे अमेरिकन ॲथलीटनं सांगितलं की, त्याचं कांस्यपदक मागच्या बाजूला तुटलं आहे आणि हळूहळू त्याचा रंग चालला आहे.
पॅरिस ऑलिम्पिकचे आयोजक या पदकांना बदलतील की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पदकविजेत्यांनी याची औपचारिकपणे विनंती केल्यास त्याची दखल घेणं अपेक्षित आहे.
हेही वाचा –
निवृत्तीनंतरही गोलकीपर श्रीजेश भारतीय संघासोबतच राहणार, हॉकी इंडियानं सोपवली मोठी जबाबदारी
पदकाच्या अगदी जवळ येऊन दूर राहिले! पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानी राहणारे भारतीय खेळाडू
“जिममध्ये रात्रभर जॉगिंग केलं…”, कांस्यपदक सामन्यापूर्वी अमनने चक्क इतके किलो वजन घटवले