टी २० विश्वचषक २०२१ च्या पहिल्या सराव सामन्यात भारताने ज्याप्रकारे कामगिरी केली, त्यामुळे सर्वांनाच मोठा दिलासा मिळाला आहे. भारतीय संघाने इंग्लंडचा तीन गडी राखून सहज पराभव केला. मोठा विजय प्राप्त करून देखील भारताचा माजी यष्टीरक्षक पार्थिव पटेल म्हणाला की भारतीय संघासाठी सर्वच गोष्टी इतक्या सहज सोप्या नाहीत. भारतीय संघसमोर दोन मोठ्या गोष्टींचे आव्हाने असतील.
टी२० विश्वचषक स्पर्धेत भारताला आपला पहिला सामना २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे. पटेल म्हणाला की, “या सामन्यापूर्वी विराट कोहली आणि संघ व्यवस्थापनासमोर अशी दोन आव्हाने आहेत जी त्यांना त्रास देऊ शकतात. हार्दिक पंड्या आणि भुवनेश्वर कुमार यांचा सध्याचा फॉर्म हा चिंतेचा विषय आहे.” भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्रा यानेही भुवनेश्वरच्या फॉर्मवर प्रश्न उपस्थित केले आहेत आणि ही एक मोठी समस्या असल्याचे सांगितले आहे.
खराब फॉर्ममध्ये आहे पंड्या
अष्टपैलू असलेल्या हार्दिकने बऱ्याच काळापासून गोलंदाजी केलेली नाही. याशिवाय त्याने फलंदाजीतही खास कामगिरी केलेली नाही. आयपीएलमध्येही हेच दिसून आले होते. इंग्लडविरुद्धच्या सराव सामन्यात तो फक्त १० चेंडूत १२ धावा करू शकला. पार्थिव पटेल याने म्हटले आहे की, “विराट पुढील सामन्यात हार्दिकच्या जागी शार्दुल ठाकूरचा संघात समावेश करू शकतो. मला भुवनेश्वर कुमारबद्दलही काळजी वाटते. त्याचा आयपीएलमध्ये होता तोच फॉर्म सध्या आहे. आयपीएलमध्ये त्याने फक्त सहा विकेट्स घेतल्या होत्या. शार्दुल ठाकूरला आपण पुढील सामन्यात पाहू शकतो.”
आकाश चोप्राने सुचवले हे बदल
भारताचा माजी सलामीवीर व प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा याने पुढील सामन्यात भुवनेश्वर कुमार व हार्दिक पांड्या यांच्या जागेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण केले. या बरोबरच पहिल्या सामन्यात अपयशी ठरलेला लेगस्पिनर राहुल चहर याच्या जागेवर वरूण चक्रवर्ती याला संधी मिळेल अशी आशा व्यक्त केली.





