क्रिकेट जगतातून मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेलने बुधवारी (९ डिसेंबर) क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने २००२ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले होते.
पार्थिव पटेलला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आता १८ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याने भारतीय संघाकडून २५ कसोटी सामने, ३८ वनडे सामने आणि २ टी२० सामने खेळले आहेत. यात कसोटीत त्याने ९३४ धावा, वनडेत ७३६ धावा आणि टी२०त ३६ धावा केल्या आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने १९४ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत.
“मला सामना स्पष्टपणे आठवतो. हा सामना आपण दिल्लीविरुद्ध जिंकला पाहिजे. आशिष नेहरा, आकाश चोप्रा, अजय जडेजा, गौतम गंभीर, मिथुन मनहास, अमित भंडारी, सरनदीप सिंग, विजय दहिया अशा दिग्गज खळाडूंविरुद्ध मी खेळलो. 156 धावांचा पाठलाग करताना दिल्ली 9 बाद 102 होती. आम्ही जवळपास जिंकलो. माझ्या कारकिर्दीची ही चांगली सुरुवात होती,” असे स्पोर्ट्सस्टारशी बोलताना पार्थिवने सांगितले होते.
त्याने १७ वर्षे आणि १५३ दिवसांच्या वयात २००२ मध्ये भारतीय संघात प्रवेश केला आणि कसोटीतील सर्वात युवा यष्टीरक्षक बनला. त्याच्या कारकिर्दीची सुरुवात चांगली असताना, २००४ मध्ये दिनेश कार्तिक आणि एमएस धोनीच्या उदयानंतर त्याने आपले स्थान गमावले होते.