भारतीय संघाकडून पदार्पण केलेला आतापर्यंतचा सर्वात युवा यष्टीरक्षक म्हणून ओळखला जाणारा पार्थिव पटेल हा मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला होता. त्यानंतर तो सातत्याने समालोचन करताना दिसत आहे. तसेच, आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघासाठी तो युवा खेळाडू पारखण्याचे काम करतोय. त्याचवेळी, पार्थिवने नुकतेच एका मुलाखतीत बोलताना आपल्या कारकीर्दीविषयी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले.
धोनीविषयी असे म्हणाला पार्थिव
पार्थिव पटेलने नुकताच एका चॅट शोमध्ये सहभागी होत मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने आपल्या कारकीर्दीविषयी अनेक उलगडे केले. एमएस धोनीमुळे तुझी आणि दिनेश कार्तिकची आंतरराष्ट्रीय कारकीर्द पुढे जाऊ शकली नाही, असे लोक म्हणतात यावर तुला काय वाटते?
या प्रश्नाचे उत्तर देताना पार्थिव म्हणाला, “मला असे अजिबात वाटत नाही. धोनीने पदार्पण करण्याच्या खूप आधी मी भारताकडून खेळलो होतो. मला भरपूर संधी देखील मिळाल्या. मात्र, मी अपेक्षित कामगिरी करू न शकल्यामुळे संघातून बाहेर गेलो. त्यानंतर धोनी आला. मला जास्त संधी मिळाली नाही याबाबत मी स्वतःला कमनशिबी मानत नाही. मला अपेक्षित संधी मिळाली नाही असे देखील मी म्हणत नाही. कारण, मी तो येण्यापूर्वी १९ कसोटी सामने खेळलो होतो. जे खूप असतात.”
पार्थिवने २००२ तर धोनीने २००५ मध्ये कसोटी पदार्पण केले होते.
अशी राहिली होती पार्थिवची कारकीर्द
पार्थिव पटेल याला अचानकपणे वयाच्या १६ व्या वर्षी इंग्लंडमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. गुजरातसाठी वयोगट स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याने त्याला २००२ एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी दिली गेलेली. पदार्पणानंतर भारतासाठी त्याने १९ कसोटी सामने खेळले होते. तसेच, २००३ वनडे विश्वचषकासाठी च्या भारतीय संघात त्यात समावेश होता. परंतु, त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर भारतीय संघात आपली जागा नक्की केली. पार्थिवने २०१० मध्ये वनडे संघात पुनरागमन केलेले. तसेच, २०१६ मध्ये तो कसोटी संघात देखील नव्याने सामील झालेला. २०१८ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तो संघाचा राखीव यष्टीरक्षक होता. आपल्या तब्बल अठरा वर्षाच्या कारकिर्दीत तो केवळ २५ कसोटी, ३८ वनडे व २ टी२० सामने खेळू शकला.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून होईल भारताचा पराभव, दिग्गज क्रिकेटपटूचा मोठा दावा
श्रीलंका संघाला क्लीन स्वीप होण्यापासून वाचवू शकते ‘ही’ एक गोष्ट; वाचा कुठली आहे ती गोष्ट