---Advertisement---

भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयाच्या चर्चेपुढे ‘हा’ मालिकावीर दुर्लक्षितच!

On: बुधवार, जानेवारी 20, 2021 11:29 AM
---Advertisement---

ब्रिस्बेन। भारतीय क्रिकेट संघाने मंगळवारी(१९ जानेवारी) ऑस्ट्रेलियाला ब्रिस्बेन कसोटीत पराभूत करत इतिहास घडवला. या विजयासह भारताने ४ कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावसकर मालिका २-१ अशा फरकाने जिंकली. या संपूर्ण मालिके भारतीय संघाने शानदार कामगिरी केली. मालिकेच्या सुरुवातीपासूनच संघातील प्रमुख खेळाडूंची गच्छंती होत होती. अशा परिस्थितीतही भारतीय संघाने संघर्ष करत बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करण्याचा पराक्रम केला. पण असे असले तरी या सर्व चर्चांमध्ये एका ऑस्ट्रेलियन खेळाडूकडे मात्र दुर्लक्ष झाले. त्या खेळाडूने ऑस्ट्रेलिया संघाकडून केवळ जबरदस्त कामगिरीच केली नाही, तर मालिकावीराचा पुरस्कारही मिळवला, तो खेळाडू म्हणजे वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स.

पॅट कमिन्सची कामगिरी – 

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स हा कसोटी क्रमवारीतील अव्वल क्रमांकाचा गोलंदाज आहे. त्यानेही अव्वल क्रमांकाला साजेल अशीच कामगिरी भारताविरुद्ध कसोटी मालिकेत खेळताना केली. तो या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. त्याने ४ सामन्यात २०.०४ च्या सरासरीने २१ विकेट्स घेतल्या. तसेच त्याने ८ डावातील ३ डावात ४ विकेट्स घेण्याची कामगिरी केली. त्याच्या याच कामगिरीमुळे त्याला या मालिकेतील मालिकावीराचा पुरस्कार घोषित करण्यात आला.

या मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये त्याच्या पाठोपाठ जोश हेजलवूड आहे. त्याने ४ सामन्यात १९.३५ च्या सरासरीने १७ विकेट्स घेतल्या. तर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज ३ सामन्यांतील २९.५३ च्या सरासरीने घेतलेल्या १३ विकेट्ससह या यादीत तिसऱ्या क्रमांकावर राहिला. तर आर अश्विन चौथ्या आणि जसप्रीत बुमराग पाचव्या क्रमांकावर आहेत. अश्विनने १२ विकेट्स आणि बुमराहने ११ विकेट्स घेतल्या.

ब्रिस्बेन कसोटी विजय – 

ऑस्ट्रेलियाचा संघ गेल्या ३२ वर्षात कधीही ब्रिस्बेन येथील गॅबा स्टेडियमवर पराभूत झाला नव्हता. पण भारतीय संघाने अखेर गॅबाचा अवघड किल्लाही सर केला आणि ऑस्ट्रेलियाला ३२ वर्षांनंतर गॅबावर पराभूत करण्याची कामगिरी केली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला ३२८ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान भारताने सामन्याच्या ५ व्या दिवशी रिषभ पंत(८९*), शुभमन गिल (९१) आणि चेतेश्वर पुजारा (५६) यांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर पुर्ण केले.

भारताने २-१ ने जिंकली मालिका- 

या कसोटी मालिकेची सुरुवात भारतासाठी खास झाली नव्हती. भारताने ऍडलेड येथे झालेला पहिला सामना ८ विकेट्सने गमावला होता. मात्र यानंतर भारताने यशस्वी पुनरागमन केले आणि मेलबर्न येथे दुसरा कसोटी सामना ८ विकेट्सने जिंकला. यानंतर सिडनी येथे झालेला कसोटी सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे ब्रिस्बेनचा सामना निर्णायक कसोटी सामना ठरणार होता. या सामन्यात भारताने विजय मिळवत मालिकेवर २-१ने कब्जा केला.

महत्त्वाच्या बातम्या –

‘आख्खं जग आज तुम्हाला सलाम करतंय’, ड्रेसिंग रूममध्ये रवी शास्त्रींकडून खेळाडूंचे तोंडभरून कौतूक; पाहा व्हिडिओ

ऐतिहासिक विजय मिळवून देणारे भारतीय संघातील हिरे! जाणून घ्या या ५ खेळाडूंची संघर्षगाथा

वेस्ट इंडिजच्या बांगलादेश दौऱ्याची या दिवशी होणार सुरुवात; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---