बॉर्डर-गावस्कर मालिकेच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव झाला. पर्थ स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघानं 295 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी अनेक धक्कादायक गोष्टी घडल्या. सामन्यानंतर बोलताना कांगारु कर्णधार पॅट कमिन्सनं यावर प्रकाश टाकला आहे.
कमिन्स म्हणाला की त्यांची तयारी चांगली होती, पण काही गोष्टी नीट झाल्या नसल्याचं त्यानं मान्य केलं. पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात विकेट्स पडल्या नसत्या तर परिस्थिती वेगळी असती, असं कमिन्सनं कबूल केलं. ॲडलेडमध्ये खेळल्या जाणाऱ्या पिंक बॉल कसोटीपूर्वी या पराभवाबद्दल बरीच चर्चा होईल, असं तो म्हणाला.
सामन्यानंतर बोलताना पॅट कमिन्स म्हणाला, “हा अतिशय निराशाजनक पराभव आहे. आम्हाला वाटलं की या सामन्यापूर्वी आमची तयारी चांगली होती. प्रत्येकजण चमकदार खेळ करत होता. हा अशा सामन्यांपैकी एक आहे, जिथे बरंच काही योग्य झालं नाही. पहिल्या दिवसाचं शेवटचं सत्र जर आम्ही खेळून काढलं असतं, तर दुसऱ्या दिवशी गोष्टी वेगळ्या राहिल्या असत्या. आम्ही शक्य तितक्या लवकर आमची लय मिळवण्याचा प्रयत्न करू. मात्र त्यापूर्वी आम्ही थोडा वेळ आराम करू.”
सामन्याबद्दल बोलायचं झाल्यास, भारतीय संघ पहिल्या डावात 150 धावांत गारद झाला. मात्र जसप्रीत बुमराहच्या झंझावाती गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाचा संघही पहिल्या डावात अवघ्या 104 धावांत ऑलआऊट झाला. पहिल्या डावाच्या आधारे भारताकडे 46 धावांची आघाडी होती. यानंतर, यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहलीच्या शतकांच्या जोरावर भारतानं 533 धावांची मोठी आघाडी घेतली आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाला 238 धावांत गुंडाळलं. अशाप्रकारे भारतानं हा सामना 295 धावांनी जिंकला. यासह टीम इंडियानं पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
हेही वाचा –
गाबानंतर पर्थचाही किल्ला ढासळला! पहिल्या कसोटीत भारताचा ऐतिहासिक विजय
“शपथ घेऊन सांगतो समोर लागला”, डीआरएस घेण्यासाठी हर्षित राणाचं मजेशीर कृत्य
WTC Points table; ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडिया अव्वल स्थानी, ऑस्ट्रेलियाची चक्क इतक्या स्थानी घसरगुंडी!