भारत आणि श्रीलंकेत सुरू असलेल्या आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६च्या स्पर्धेत ३०वा सामना श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा झाला. सोमवारी (१६ फेब्रुवारी) खेळल्या गेलेल्या या सामन्यात श्रीलंकेच्या पथुम निसांकाचाच खेळ पाहायला मिळाला. त्याने पकडलेल्या एका झेलमुळे ऑस्ट्रेलियाचे स्पर्धेतील स्थान धोक्यात आले आहे, असे म्हणता येईल. त्याने पकडलेला कॅच पाहून सगळेच चकित झाले.
या स्पर्धेत अनेक उत्तम क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आहे. आता त्यामध्ये निसांकाचेही नाव जोडले गेले आहे. त्याने संघाला सुपर ८मध्ये पोहोचण्यासाठी एक झेल पकडत मोठी मदतच केली. त्याचा हा झेल संघासाठी तर विशेष होताच, त्याचबरोबर या स्पर्धेतील तो सर्वोत्तम झेल ठरला आहे.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू होती तेव्हा, मार्श-हेड यांनी संघाला उत्तम सुरूवात करून दिली. त्या दोघांच्या विकेटनंतर मात्र ऑस्ट्रेलियाचा डाव अडखळला. जोश इंग्लिस आणि मॅक्सवेल यांनी संयमी खेळी करत धावफलक हलता ठेवला. त्यामुळे श्रीलंकेची चिंता वाढताना दिसली.
ऑस्ट्रेलियाच्या १६ व्या षटकात श्रीलंकेला मॅक्सवेलची विकेट घेण्याची संधी होती, मात्र दुष्मंता चामीराच्या त्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर निसांकाने त्याचा सोपा झेल सोडला. त्यामुळे श्रीलंकेच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरली. या घटनेचा परिणाम मात्र निसांकाने होऊ दिला नाही आणि त्याने पुढच्याच षटकात त्याची भरपाई केली.
दुशन हेमंथाच्या त्या १७व्या षटकातील पहिल्या चेंडूवर मॅक्सवेलने रिव्हर्स स्वीप खेळला. निसांकाने मात्र ही संधी जाऊ दिली नाही आणि हवेत सूर मारत तो चेंडू झेलला. मॅक्सवेल २२ धावा (१५ चेंडू) करत बाद झाला. ऑस्ट्रेलियाने १६ षटकात ४ विकेट्स गमावत १६० धावा केल्या होत्या आणि खेळपट्टीवर मॅक्सवेल उभा होता. तेव्हा वाटले ऑस्ट्रेलिया २००च्या पुढे जाईल. निसांकाच्या त्या झेलमुळे ऑस्ट्रेलियाच्या विकेट्स नंतर पडतच राहिल्या. त्यांनी २० षटकात सर्व विकेट्स गमावत १८१ धावसंख्या उभारली. यामध्ये कर्णधार मिचेल मार्श आणि ट्रेविस हेड यांनी अर्धशतकी खेळी केल्या. त्यामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले मॅक्सवेलची विकेट किती महत्वाची होती ते.
लक्ष्याचा पाठलाग करताना निसांकाने नाबाद शतकी खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. त्यामध्ये कुशल मेंडिसनेही ५१ धावा केल्या होत्या. पवन रथनायकेच्या नाबाद २८ धावा, यामुळे श्रीलंकेने हा सामना २ षटक आणि ८ विकेट्स शिल्लक राखत जिंकला. त्याचबरोबर ते सुपर-८मध्ये पोहोचले. ऑस्ट्रेलियाला सुपर ८मध्ये जाण्यासाठी आयर्लंडने झिम्बाब्वेचा पराभव करणे आवश्यक आहे.





