प्रो कबड्डीच्या सहाव्या मोसमात शुक्रवारी(8 डिसेंबर) पटना पायरेट्स विरुद्ध पुणेरी पलटन संघात 101 वा सामना पार पडला. या सामन्यात पटना पायरेट्स संघाने 56 – 36 अशा फरकाने एकतर्फी विजय मिळवला. या बरोबरच हा सामना पटनाचा कर्णधार परदीप नरवालसाठीही खास ठरला आहे.
त्याने या सामन्यात तब्बल 27 रेड पॉइंट्स मिळवताना प्रो कबड्डीच्या इतिहासात 800 रेड पॉइंट्स मिळवण्याचा टप्पा पार केला आहे. हा टप्पा पार करणारा तो पहिलाच कबड्डीपटू ठरला आहे. त्याने त्याच्या 80 व्या सामन्यात हा पराक्रम केला आहे.
त्याला हा पराक्रम करण्यासाठी या सामन्याआधी 17 रेड पॉइंट्सची गरज होती. पण त्याने त्यापेक्षा 10 पॉइंट्स जास्त मिळवत हा विक्रम सहज आपल्या नावावर केला आहे. त्याने आत्तापर्यंत प्रो कबड्डीमध्ये 80 सामन्यात 810 रेड पॉइंट्सची कमाई केली आहे.
त्याचबरोबर त्याने प्रो कबड्डीमध्ये एकूण 800 पॉइंट्स मिळवण्याचा टप्पाही त्याने पार केला आहे. प्रो कबड्डीमध्ये असा कारनामा करणारा तो तेलगू टायटन्सचा स्टार रेडर राहुल चौधरीनंतरचा दुसराच कबड्डीपटू ठरला आहे.
प्रो कबड्डीमध्ये सर्वाधिक एकूण पॉइंट्स घेणारा तसेच 800 पॉइंट्सचा टप्पा गाठणारा राहुल पहिला कबड्डीपटू होता. तसेच त्याने 93 सामन्यात 819 पॉइंट्स मिळवले आहेत. तो प्रो कबड्डीमध्ये सर्वाधिक एकूण पॉइंट्स घेण्याच्या यादीत अव्वल क्रमांकावर आहे. त्याच्या पाठोपाठ परदीप असून परदीपचे 80 सामन्यात 817 पॉइंट्स झाले आहेत.
परदीपसाठी प्रो कबड्डीचा सहावा मोसमही यशस्वी ठरत आहे. त्याने सहाव्या मोसमात 16 सामन्यात 185 पॉइंट्स मिळवले आहेत. तसेच तो सहाव्या मोसमात आत्तापर्यंत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या कबड्डीपटूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
प्रो कबड्डीमध्ये सर्वाधिक पॉइंट्स मिळवणारे कबड्डीपटू:
819 – राहुल चौधरी (93 सामने)
817 – परदीप नरवाल (80 सामने)
718 – अजय ठाकूर (97 सामने)
700 – दीपक हुडा (94 सामने)
602 – काशिलिंग अडके (87 सामने)
प्रो कबड्डीमध्ये सर्वाधिक रेड पॉइंट्स मिळवणारे कबड्डीपटू:
810 – परदीप नरवाल (80 सामने)
771 – राहुल चौधरी (93 सामने)
697 – अजय ठाकूर (97 सामने)
629 – दीपक हुडा (94 सामने)
553 – काशिलिंग अडके (87 सामने)
महत्त्वाच्या बातम्या:
–नामदार कबड्डी स्पर्धेत राजमाता, सुवर्णयुगचा विजय तर या दोन संघाचे मात्र पराभव
–राज्य कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत मुंबई, पुण्याचा दणदणीत विजय