इंग्लंडचा माजी कर्णधार पॉल कॉलिंगवूड हा इंग्लंड संघाचा प्रतिनिधी म्हणून पुढील महिन्यात पाकिस्तान संघाविरुद्ध पाकिस्तान देशात होणाऱ्या वर्ल्ड ११ संघात खेळणार आहे. ३ सामन्यांची ही मालिका पुढील महिन्यात होणार असून याचे प्रशिक्षकपद इंग्लंडच्याच अँडी फ्लॉवरकडे देण्यात आले आहे.
पाकिस्तान देशात आंतरराष्ट्रीय स्थरावरील क्रिकेट परतण्यासाठी आयसीसी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत असून त्याचाच एक भाग म्हणून ही मालिका आयोजित करण्यात आली आहे.
द गार्डियनशी बोलताना आपण या मालिकेसाठी उपलब्ध असल्याचं कॉलिंगवूडने सांगितलं आहे. त्याचाच नेतृत्वाखाली इंग्लंडने आयापर्यँत एकदाच आणि पहिल्यांदाच आयसीसीची स्पर्धा अर्थात टी२० विश्वचषक जिंकला होता.
पाकिस्तानमध्ये लाहोर शहरात १२, १३ आणि १५ सप्टेंबर रोजी ही मालिका खेळवली जाणार आहे. यात दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमला आणि इम्रान ताहीर या दोघांचा समावेश असू शकतो.
या मालिकेत खेळणाऱ्या प्प्रत्येक खेळाडूला £७५,००० मिळणार आहे. या मालिकेला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात आला आहे. संघाला मिलिटरीचे मोठे संरक्षण असणार आहे. जर कॉलिंगवूडला या मालिकेत संधी मिळाली तर त्यादरम्यान सुरु असणाऱ्या काउंटीच्या काही सामन्यांना त्याला मुकावे लागणार आहे.
या मालिकेत इंग्लंडबरोबर ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि न्युझीलँड या देशाचे खेळाडू खेळू शकतात. भारतीय खेळाडू यात भाग घेण्याची शक्यता अतिशय कमी आहे.