क्रिकेटविश्वात ‘युनिव्हर्स बॉस’ नावाने प्रसिद्ध असलेला ख्रिस गेल त्याच्या लक्षणीय फटकेबाजीसाठी ओळखला जातो. भलेही या शिलेदाराने वयाची चाळीशी पार केली, तरीही त्याच्या फलंदाजीची धार मात्र अजूनही युवा क्रिकेटपटूप्रमाणेच भासते. शुक्रवार रोजी (२३ एप्रिल) चेन्नई येथे पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात झालेला आयपीएल २०२१ चा सतरावा सामना पंजाबने ९ विकेट्सने जिंकला.
या सामन्यात पुन्हा एकदा गेलच्या नेत्रदिपक फटकेबाजीचे दर्शन घडले. त्यातही मुंबईचा फिरकीपटू जयंत यादवच्या चेंडूवर त्याने मारलेला गगनचुंबी षटकार लक्षवेधी ठरला. त्याच्या या अप्रतिम शॉटला पाहून संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक जॉन्टी रोड्सही प्रभावित झाल्याचे पाहायला मिळाले.
त्याचे झाले असे की, मुंबई इंडियन्सच्या १३२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबने संथ सुरुवात केली होती. अर्धशतकी भागिदारी केल्यानंतर त्यांचा सलामीवीर मयंक अगरवाल २५ धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर गेल फलंदाजीसाठी आला. मुंबईच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे सुरुवातीला काहीवेळ त्याने आपली बॅट शांत ठेवली. परंतु संधी मिळताच तो अधूनमधून एखादा फटका खेळून मोकळा व्हायचा.
अशात डावातील १५ वे षटक टाकण्यासाठी मुंबईचा फिरकी गोलंदाज जयंत यादव आला होता. त्याच्या षटकातील पहिलाच चेंडू डॉट राहिला. त्यानंतर जयंतने फुल लेंथने दुसरा चेंडू फेकला. यावर गेलने अगदी सहज फटका मारला आणि चेंडू हवेतून जात थेट स्टेडियमबाहेर पडला. त्याचा हा ९३ मीटरचा अप्रतिम षटकार पाहून मुंबईचा कर्णधार रोहितचे तोंड पडले. मात्र पंजाब संघाच्या डगआउटमध्ये जल्लोषाचे वातावरण तरळले.
पंजाबचे प्रशिक्षक अनिल कुंबळेसह इतर खेळाडूंनीही टाळ्यांच्या कडकडाटात गेलच्या या शॉटचे कौतुक केले. यावेळी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक जॉन्टी रोड्स तर जागचे उभे राहिले मोठमोठ्याने गेलचे अभिनंदन करत ओरडू लागले. त्यांच्या या रिऍक्शनने सामना दर्शकांचे लक्ष वेधले आहे.
https://twitter.com/lodulalit001/status/1385647135593353222?s=20
सामन्याखेर गेलच्या वादळाला रोखण्यात मुंबईकरांना अपयश आले. तो ३५ चेंडूत २ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ४३ धावा करत नाबाद राहिला. त्याच्या या खेळीच्या जोरावर पंजाबने १७.४ षटकात मुंबईचे आव्हान पूर्ण केले. अशाप्रकारे ९ विकेट्सने पंजाबने हंगामातील दुसरा विजय साजरा केला.
महत्त्वाच्या बातम्या-
‘बॉल सुखा है, घूम रहा है’; जेव्हा लाईव्ह सामन्यात रोहित गोलंदाजाला देतो धडे, पाहा व्हिडिओ
तब्बल ६ विश्वचषक सचिनने ते स्वप्न उराशी बाळगले अन् अखेर २०११ला ते पुर्ण झाले
PBKSvMI: दारुण पराभवानंतर कर्णधार रोहितने टोचले फलंदाजांचे कान, म्हणाला…