न्यूझीलंडचा बहुप्रतिक्षित पाकिस्तान दौरा दुर्दैवी पद्धतीने रद्द करण्यात आला. न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानमध्ये तीन एकदिवसीय आणि पाच टी -२० सामन्यांसाठी आला होता. त्यांना एकही सामना न खेळवता परत बोलावण्यात आले. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने हा दौरा अचानक रद्द करण्यामागे सुरक्षेच्या समस्यांचे कारण दिले होते. महत्वाची बाब म्हणजे, २००४ नंतर पाकिस्तानच्या भूमीवर न्यूझीलंड क्रिकेट संघ पहिल्यांदाच मालिका खेळण्यासाठी दाखल झाला होता.
पाकिस्तानसाठी या मालिकेचे खूप महत्त्व होते, म्हणून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने खूप तयारी केली होती. मात्र, दौरा रद्द झाल्याने त्यांना निराशेचा सामना करावा लागला. ताज्या घडामोडीनुसार, न्यूझीलंडविरुद्धची मालिका रद्द झाल्यामुळे पाकिस्तानला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डला न्यूझीलंड संघासाठी नियुक्त केलेल्या सुरक्षा अधिकार्यांच्या जेवणाची बिले देण्यासाठी भरमसाठ रक्कम लागणार आहे.
माध्यमांतील अहवालांनुसार, न्यूझीलंडसाठी नियुक्त केलेल्या सुरक्षा एजन्सीवर मोठा खर्च करण्यात आला. पीसीबीला न्यूझीलंड संघाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या अधिकार्यांच्या खाद्य बिलाची भरपाई करण्यासाठी सुमारे २७ लाख रुपये भरणे आवश्यक आहे. पाच एसपी आणि ५०० पेक्षा जास्त एसएसपी (पोलीस अधिकारी) इस्लामाबाद आणि रावळपिंडी येथे पाकिस्तानी सैन्यासह न्यूझीलंडच्या सुरक्षेसाठी तैनात होते.
प्रत्येक सुरक्षा कर्मचाऱ्यांनी दिवसातून दोनदा बिर्याणी खाल्ली, ज्याची किंमत अंदाजे २७ लाख झाली आहे. दरम्यान, रावळपिंडी येथे झालेल्या पहिल्या वनडेच्या काही तास आधी हा दौरा रद्द करण्यात आला होता.
पाच सामन्यांच्या टी -२० मालिकेसाठी लाहोरला जाण्यापूर्वी रावळपिंडी येथे तीन एकदिवसीय सामन्यांपैकी पहिल्या सामना होणार होता. पाकिस्तानमध्ये न्यूझीलंड संघाच्या सुरक्षेला धोका होऊ शकतो असे न्यूझीलंडच्या सुरक्षा सल्लागारांनी सांगितल्याने, न्यूझीलंडने हा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, पाकिस्तान आणि न्यूझीलंड दोन्ही संघ सध्या टी -२० विश्वचषकासाठी सज्ज आहेत. पाकिस्तानने २००९ मध्ये विश्वचषक स्पर्धा जिंकली असली तरी न्यूझीलंडसाठी ही स्पर्धा सोपी राहिलेली नाही. म्हणूनच, जागतिक स्पर्धेत दोन्ही संघ कसे कामगिरी करतात हे पाहणे मनोरंजक असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
अफगाणिस्तानची टी२० विश्वचषकातून होणार गच्छंती? अजब आहे कारण
मॅच विनिंग कामगिरी कार्तिक त्यागीची, पण चर्चा होतेय नीरज चोप्राची; पाहा काय आहे नक्की प्रकरण
वॉर्नरच्या सातत्याची अखेर! तब्बल ‘इतक्या’ वर्षांनी झाला शून्यावर बाद