संपूर्ण जग सध्या कोरोना व्हायरसच्या जाळ्यात गुंतले आहे. त्यामुळे भारत देशासह इतर बऱ्याच देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशात अनेक क्रिकेटपटू घरी आपला वेळ घालवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करत आहेत.
अशामध्ये ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू पीटर हँड्सकॉम्ब (Peter Handscomb) याने लॉकडॉनचा पुरेपूर फायदा घेत, त्याच्या लहानपणीपासूनच्या घोडेस्वारीच्या भीतीवर मात केली आहे.
पीटरच्या पत्नीला घोडेस्वारीची आवड असून त्याने मात्र एकदाही घोड्यावर बसून फेरफटका मारण्याचा प्रयत्नही केला नाही. त्याच्या पत्नीने २०१६मध्ये रिओ ऑलिंपिक्समध्ये सहभाग नोंदवला होता. मात्र, त्यावेळी तिला घोड्यावरून पडल्यामुळे घोट्याला दुखापत झाली होती.
२८ वर्षीय पीटरने (Peter Handscomb) आज (२३ एप्रिल) एका व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “मी ७ वर्षांचा असताना घोड्याच्या आकाराला बघून खूप घाबरायचो.तेव्हा मनात बसलेल्या या भीतीमुळे माझ्या पत्नीकडे ४ घोडे असूनही मी कधीही घोडेस्वारी (Horse Riding) करण्याचा विचार केला नाही.”
“सध्या लॉकडाऊनमुळे मी माझ्या पत्नीसह मेलबर्नजवळील ग्रामीण भागातील माझ्या घरी अडकलो आहे. म्हणून मी विचार केला की, हीच योग्य वेळ आहे आपली भीती घालवण्याची. त्या अनुशंगाने मी माझ्या पत्नीसोबत घोडेस्वारीला गेलो. सहज आम्ही एक फेरफटका मारला आणि तो अत्यंत आनंददायी ठरला,” असेही पीटर पुढे बोलताना म्हणाला.
“माझा मोकळा वेळ घालवण्यासाठी मी माझी क्रिकेट रूम साफ करत असतो. तसेच बागेतील गवतही कापत असतो. अशा अनेक कामांमुळे माझा बराचसा वेळ निघून जातो आणि मला हे करण्यात खूप मजाही येते,” असेही पीटरने सांगितले.
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे घरी राहून पीटर धावणे, पायलेट्स (व्यायामाचा प्रकार) आणि योगा यांद्वारे स्वत:ला फीट ठेवत आहे. तसेच तो त्याच्या पत्नीला घरकामातही मदत करत आहे.
पीटरने ऑस्ट्रेलियाकडून १६ कसोटी सामने, २२ वनडे सामने आणि २ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने कसोटीत ३८.९१ च्या सरासरीने ९३४ धावा केल्या आहेत. त्यात २ शतके आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे.
तसेच वनडेत त्याने ३३.२६ च्या सरासरीने ६३२ धावा केल्या आहेत. त्यात १ शतक आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर टी२०त त्याने ३३ च्या सरासरीने केवळ ३३ धावा केल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-वाढदिवसालाच क्रिकेटमध्ये वाढीव कारनामा करणारे ५ खेळाडू
-आयपीएल इतिहासातील सर्वोत्कृष्ट कर्णधाराचा मान या क्रिकेटपटूच्या नावावर






