क्रिकेट हा असा खेळ आहे, जिथे फलंदाजी करताना १०० धावा कुटणे ही मोठी गोष्ट समजली जाते. मग या धावा जर गोलंदाज असणाऱ्या खेळाडूने केल्या, तर त्याचा आनंद गगनात मावेनासा होतो. परंतु जर त्याला पहिल्यांदाच १०० धावांचा टप्पा गाठता आला नाही, तर तो फारच निराश होतो. असेच काहीसे ऑस्ट्रेलियाचा घातक वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कसोबत शेफील्ड शिल्डमध्ये घडले. त्याला आपल्या कर्णधाराच्या डाव घोषित करण्याच्या निर्णयामुळे प्रथम श्रेणी शतक पूर्ण करता आले नाही. आता डाव घोषित करण्याचे कारण कर्णधार पीटर नेविलने सांगितले आहे.
डाव घोषित करण्याबाबत आता कर्णधाराचे मोठे वक्तव्य
मिचेल स्टार्क या सामन्यात आपले शतक पूर्ण करू शकत होता. परंतु कर्णधार पीटर नेविलने डाव घोषित केल्याने त्याचे पहिले प्रथम श्रेणी शतक हुकले. यावर कर्णधार नेविलने वक्तव्य केले आहे.
ईएसपीएन क्रिकइन्फोशी चर्चा करताना तो म्हणाला, “माझी याबाबत मिचेल स्टार्कसोबत चर्चा झाली होती. डाव घोषित केल्याबाबत मी त्याची माफी मागितली. त्याने त्याचे शतक पूर्ण केले असते, तर मला खूप चांगले वाटले असते. परंतु त्यावेळी आमच्यासाठी विरुद्ध संघाला दिवसाचा डाव संपण्यापूर्वी शेवटच्या ४५ मिनिटांसाठी खेळवणे आवश्यक होते.”
नेविलने पुढे बोलताना म्हटले की, “सायंकाळीच त्यांच्या दोन विकेट्स घेण्याचा आमचा प्रयत्न होता. जेणेकरून दुसऱ्या दिवशी आम्हाला त्याचा फायदा मिळाला असता. निश्चितच मिचेल स्टार्क यावर नाराज होईल. कारण तो खूप चांगली फलंदाजी करत होता. तो आपले शतक पूर्ण करण्याच्या खूप जवळ होता. मला विश्वास आहे की, तो अशाचप्रकारे खेळत राहिला, तर त्याच्याकडे लवकरच शतक ठोकण्याची आणखी एक संधीही येईल.”
डाव घोषित केल्यामुळे हुकले शतक; स्टार्कचा चढला पारा
शेफील्ड शिल्ड या स्पर्धेतील ८ वा सामना तस्मानिया आणि न्यू साऊथ वेल्स संघात झाला. यादरम्यान न्यू साऊथ वेल्सकडून मिचेल स्टार्क १ षटकार आणि ९ चौकारांसह ८६ धावांवर खेळत होता. यावेळी तो चांगल्या लयीत फलंदाजी करत होता. त्याचवेळी त्याचा संघसहकारी सीन ऍबॉटने जसे आपले शतक पूर्ण केले, तसे कर्णधार नेविलने डाव घोषित केला.
Peter Nevill declared while Mitch Starc was on 86*…
The quick wasn't too happy! #SheffieldShield pic.twitter.com/NQLTkh1L0w
— cricket.com.au (@cricketcomau) November 10, 2020
यामुळे मिचेल स्टार्क निराश झाला होता. त्याने बाऊंड्री क्रॉस करत मैदानाबाहेर पाऊल टाकताच आपली बॅट रागाने फेकून दिली. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.