मोहाली। आयपीएल 2019 मध्ये सोमवारी किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात सामना पार पडला. नाट्यमय झालेल्या या सामन्यात पंजाबने 14 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात पंजाबच्या युवा अष्टपैलू क्रिकेटपटू सॅम करनने विकेटची हॅट्रिक करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
त्याने या सामन्यात 11 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. यात त्याच्या हॅट्रिकचा समावेश आहे. त्याने या सामन्यात गोलंदाजी करताना 18 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर दिल्लीच्या हर्षल पटेलला बाद केले. त्यानंतर पुन्हा 20 षटकात गोलंदाजीला येत पहिल्या दोन चेंडूवरच अनुक्रमे कागिसो रबाडा आणि संदिप लामिछाने यांना बाद करत आयपीएल 2019मधील पहिली हॅट्रिक केली.
त्याचबरोबर या सामन्यात तो पंजाबकडून केएल राहुलबरोबर सलामीला फलंदाजीसाठी सुद्धा आला होता. त्याने राहुलबरोबर सलामीला येत 10 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 20 धावाही केल्या.
त्यामुळे त्याच्या आणि भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगच्या बाबतीत एक खास योगायोग झाला आहे.
आयपीएलमध्ये एकाच सामन्यात सलामीला फलंदाजी आणि विकेटची हॅट्रिक घेणारा करन हा युवराज नंतरचा दुसराच खेळाडू ठरला आहे.
युवराजने आयपीएलमध्ये 10 वर्षांपूर्वी 1 मे 2009 ला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध खेळताना हॅट्रिकही घेतली होती. तसेच आयपीएलमध्ये पहिल्यांदाच सलामीला फलंदाजीही केली होती. विशेष म्हणजे त्यावेळी युवराजही किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळत होता.
त्या सामन्यात युवराजने रॉबीन उथप्पा, जॅक कॅलिस आणि मार्क बाउचर यांना बाद करत हॅट्रिक साजरी केली होती. तसेच नंतर सलामीला फलंदाजी करताना 50 धावांची अर्धशतकी खेळीही केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
–आठवण – भारताच्या विश्वविजयाची
–गंभीर, धोनी ठरले विजयाचे शिल्पकार, २०११ ला भारताने दुसऱ्यांदा जिंकला विश्वचषक