जगातील सर्वात मोठी व्यवसायिक कबड्डी लीग असलेल्या प्रो कबड्डी लीगचा आठवा हंगाम बेंगलोर येथे सुरू आहे. स्पर्धेच्या सहाव्या दिवशी पहिल्या सामन्यात तमिल थलाइवाज आणि यु मुंबा हे संघ आमनेसामने आले. बचाव भक्कम असलेल्या या दोन्ही संघांमधील हा सामना चांगलाच रंगला. तमिल थलाइवाजने शेवटच्या रेडवर मुंबईच्या रेडरची पकड करत सामना ३०-३० असा टाय केला.
फजल अत्रचलीच्या नेतृत्वातील यु मुंबा संघाला सुरजित सिंग याच्या नेतृत्वातील तमिल थलाइवाज संघाने पहिल्या हाफमध्ये चांगलेच जेरीस आणले. मात्र, अजित कुमारने पहिल्या हाफच्या अखेरीस सुपर रेड करत संघाला पुनरागमन करून दिले. तमिल संघाकडे पहिल्या हाफमध्ये ३ गुणांची आघाडी होती. दुसऱ्या हाफमध्ये दोन्ही संघांनी अत्यंत आक्रमक खेळ करत सामना अटीतटीचा बनवला. शेवटच्या क्षणी सामना मुंबईचा बाजूने होता. मात्र, अखेरची रेड मारण्यासाठी आलेल्या अजित कुमारला तमिल संघाच्या मोहित याने ब्लॉक करत सामना टाय केला. मुंबईसाठी रेडर अजितकुमारने १५ गुणांची कमाई केली. तमिल थलाइवाज संघासाठी हा दुसरा टाय सामना ठरला.