क्रिकेट संघात बऱ्याचदा प्रत्येक खेळाडूचा फलंदाजी क्रमांक जवळपास निश्चित असतो. तो क्रिकेटपटू अनेक वर्षे त्याच क्रमांकावर फलंदाजी करताना दिसतो. खूप कमीवेळा त्याचा फलंदाजी क्रमांक बदलतो. त्यामुळे प्रत्येक फलंदाज हा त्याच्या फलंदाजी क्रमांकानुसार सराव करत असतो. पण जर फलंदाजांचा फलंदाजी क्रमांकच निश्चित नसेल आणि कर्णधार आपल्या इच्छेनुसार त्याला कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीस पाठवत असेल तर काय? अशा वेळी त्या फलंदाजाला प्रत्येक क्रमांकावर स्वत:ला सिद्ध करावे लागते.
असे कसोटी क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत ५ क्रिकेटपटू आहेत ज्यांनी सलामीपासून (१ किंवा २ क्रमांकाचा फलंदाज) ते ११ व्या क्रमांकापर्यंत फलंदाजी केली आहे. यात नुकताच इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सचा समावेश झाला आहे. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध सुरु असलेल्या मँचेस्टर कसोटीत दुसऱ्या डावाची सुरुवात केली आहे. म्हणजेच त्याने सलामीला फलंदाजी केली आहे. त्यामुळे तो आता सलामी ते ११ व्या क्रमांकावर फलंदाजी करणारा एकूण ५ व्या क्रिकेटपटू ठरला आहे.
सलामी ते ११ व्या क्रमांकावर फलंदाजी केलेल्या ५ क्रिकेटपटूंमधील ४ जण चांगले अष्टपैलू क्रिकेटपटू आहेत. या लेखात या ५ खेळाडूंचा आढावा घेतला आहे.
सलामी ते ११ व्या क्रमांकावर फलंदाजी केलेले क्रिकेटपटू –
५. विलफ्रेड ऱ्होड्स –
इंग्लंडचे विलफ्रेड ऱ्होड्सचे हे एक उत्तर अष्टपैलू क्रिकेटपटू होते. १८९९ ते १९३० दरम्यान ते कसोटी क्रिकेट खेळले. या दरम्यान त्यांनी अनेकदा चांगली कामगिरी केली. त्यांनी २३२५ धावा केल्या आणि १२७ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्यांच्याकडे कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्याची क्षमता होती.
विशेष म्हणजे त्यांनी १९०३-०४ च्या मोसमात सिडनी येथे ११ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना आरई फॉस्टर यांच्यासह १३० धावांची १० व्या विकेटसाठी भागीदारी केली होती. यावेळी त्यांनी नाबाद ४० धावा केल्या होत्या. एवढेच नाही तर त्यांनी या सामन्यानंतर ८ वर्षांनी सलामीला फलंदाजी करताना मेलबर्न येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध हॉब्स यांच्यासह पहिल्या विकेटसाठी ३२३ धावांची विक्रमी भागीदारी केली होती.
ऱ्होड्स यांनी १ ते ११ अशा सर्व क्रमांकावर फलंदाजी केली आहे.
४. सडनी ग्रेगोरी –
ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटी सिडनी ग्रिगोरी क्रिकेटचा वारसा असणाऱ्या कुटुंबातच जन्मले. त्यांनी १८९० ते १९१२ दरम्यान ऑस्ट्रेलियाकडून ५८ कसोटी सामने खेळले. त्यातील ५२ सामने ते इंग्लंड विरुद्ध तर ६ सामने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळले. त्यांनी पदार्पणाच्या सामन्यात दोन्ही डावात ६ व्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. तर अंतिम सामन्यात ते सलामीला फलंदाजीसाठी उतरले होते.
त्यांच्याकडेही कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्याची क्षमता होती. ५.५ फुट उंची असलेल्या सिडनी यांचे फुटवर्क चांगले होते. त्यांनी कसोटीमध्ये १ ते ११ अशा सर्व क्रमांकावर फलंदाजी केली आहे. या सर्व क्रमांकावर फलंदाजी करताना त्यांनी एकूण ४ शतकांसह २२८२ धावा केल्या. ग्रेगोरी यांनी कारकिर्दीच्या शेवटी ऑस्ट्रेलियाचे नेतृत्वही केले होते.
३. विनू मंकड –
भारताचे दिग्गज क्रिकेटपटू विनू मंकड हे उत्तम अष्टपैलू क्रिकेटपटूंमध्ये गणले जातात. त्यांच्याकडेही सलामीपासून ते शेवटच्या क्रमांकापर्यंत फलंदाजी करण्याचे कौशल्य होते. मंकड यांनी खेळलेल्या ४४ कसोटी सामन्यात ५ शतकांसह २१०९ धावा केल्या होत्या आणि १६२ विकेट्स घेतल्या होत्या. या दरम्यान त्यांनी १ ते ११ अशा सर्व क्रमांकावर फलंदाजी केली आहे.
विशेष म्हणजे १९५६ला चेन्नईतील न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत सलामीला फलंदाजी करत त्यांनी २१ चौकारांसह २३१ धावा केल्या होत्या. यासह त्यांच्या नावावर कसोटीत सर्वाधिक वैयक्तिक धावा करण्याच्या विक्रमाची नोंद झाली होती. पुढे, जवळपास २ दशकांनंतर सुनील गावस्करांनी २३६ धावा करत त्यांचा विक्रम मोडला.
याव्यतिरिक्त त्याच सामन्यात मंकड आणि त्यांचे संघसहकारी पंकज रॉय यांनी मिळून सलामीला ४१३ धावांची भागिदारी रचली होती. त्यांच्या या भागीदारीचा विक्रम नंतर २००८मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या नील मॅकेंजी आणि ग्रीम स्मिथ यांनी मोडला.
२. नसीम-उल-घनी –
पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू नसीम-उल-घनी एक चांगले डावकरी फिरकीपटू होते. त्यांना मध्यमगीने चेंडू टाकण्याचीही कला अवगत होती. एवढेच नाही तर ते चांगले फलंदाजही होते. त्यांनी पाकिस्तानसाठी सलामीला फलंदाजीही केली आहे, तसेच ११ व्या क्रमांकावरही फलंदाजी त्यांनी केली आहे. त्यांनी १९६२ ला लॉर्ड्सवर नाईट वॉचमन म्हणून फलंदाजीला येत शतकी खेळीही केली होती.
त्यांनी त्यांच्या कसोटी कारकिर्दीत केवळ दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली नाही. पण ते बाकी सर्व क्रमांकावर त्यांनी फलंदाजी केली आहे.
केवळ १६ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या घनी यांनी पाकिस्तानकडून १९५८ ते १९७३ दरम्यान २९ कसोटी सामने खेळले. यात त्यांनी १ शतक आणि २ अर्धशतकांसह ७४७ धावा केल्या आणि ५२ विकेट्स घेतल्या.
१. बेन स्टोक्स –
सलामी ते ११ व्या क्रमांकावर फलंदाजी करणारा ५ वा क्रिकेटपटू मिळण्यासाठी ४७ वर्षे लागली. तो पाचवा क्रिकेटपटू ठरला बेन स्टोक्स. त्याने आत्तापर्यंतच्या कसोटी कारकिर्दीत केवळ दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली नाही. पण ते बाकी सर्व क्रमांकावर त्यांनी फलंदाजी केली आहे.
त्याने १,३,९,१० आणि ११ या क्रमांकावर प्रत्येकी १ वेळा फलंदाजी केली आहे. तसेच ४ थ्या क्रमांकावर ३ वेळा, ५ व्या क्रमांकावर १९ वेळा, ७ व्या क्रमांकावर ६ वेळा आणि ८ व्या क्रमांकावर २ वेळा फलंदाजी केली आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत सर्वाधिकवेळा ६ व्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. त्याने ४४ वेळा ६ व्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. त्याला १० व्या आणि ११ व्या क्रमांकावर २०१५ ला शारजाह येथे खांद्याच्या दुखापतीमुळे फलंदाजी करावी लागली होती. केवळ दुसऱ्या क्रमांकावर त्याने आता फलंदाजी केलेली नाही.
स्टोक्सने आत्तापर्यंत ६५ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने ४००० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. तसेच १५० पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
वाचनीय लेख –
या ३ संघांसाठी आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचणे जवळपास अशक्य
५ असे प्रसंग जेव्हा एमएस धोनी आपल्या खेळाडूंच्या बचावासाठी आला पुढे…
गोष्ट कशाचीही फिकीर न करता मनमर्जी करणाऱ्या एका क्रिकेट प्रशासकाची