सध्या ओमान आणि संयुक्त अरब अमिराती येथे टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा रंगली आहे. हे टी२० विश्वचषकाचे एकूण सातवे पर्व आहे. २००७ साली या स्पर्धेला सुरुवात झाली होती. तेव्हापासून गेल्या १४ वर्षांत सातव्यांदा ही स्पर्धा खेळवली जात आहे. या स्पर्धेत अनेक नवीन खेळाडू यंदा खेळताना दिसत आहे. याबरोबरच काही अनुभवी खेळाडूही या स्पर्धेत दिसले आहेत. विशेष म्हणजे असे ६ खेळाडू देखील आहेत, ज्यांनी आजपर्यंत झालेले सर्व टी२० विश्वचषक खेळले आहेत.
या लेखात आपण अशा खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत, जे पहिल्या टी२० विश्वचषकापासून या स्पर्धेचा भाग राहिले आहेत. या यादीतील खेळाडूंचा हा सातवा टी२० विश्वचषक आहे.
मुशफिकुर रहीम
बांगलादेशचा यष्टिरक्षक-फलंदाज मुशफिकुर रहीम हा या खेळाडूंपैकी एक आहे, जो यावेळी देखील टी२० विश्वचषक स्पर्धेचा भाग बनला आहे. त्याने आतापर्यंतचे सातही टी-२० विश्वचषक खेळले आहेत. त्याने या स्पर्धेतील ३१ सामन्यात ४०१ धावा केल्या आहेत.
शाकिब अल हसन
जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक शाकिब अल हसन हा सर्व टी २० विश्वचषक स्पर्धेत भाग घेत आला आहे. त्याने ३१ सामन्यात २६.८४ च्या सरासरीने ६९८ धावा करण्यासोबतच, त्याने १७.२९ च्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या सरासरीने ४१ विकेट्स देखील घेतल्या आहेत. यासोबतच, शाकिब आता आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे, नुकताच त्याने लसिथ मालिंकाचा विक्रम मोडला होता.
मोहम्मदुल्ला
बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मदुल्ला याने आतापर्यंत सर्व टी २० विश्वचषक स्पर्धेत भाग घेतला आहे. त्याने २८ सामन्यात ३४४ धावा केल्या असून ८ विकेट्सही घेतल्या आहेत. मोहम्मदुल्ला सध्या बांगलादेशचा कर्णधार आहे, त्याने त्याच्या नेतृत्वाखाली संघाला सुपर-१२ मध्ये प्रवेश मिळवून दिला आहे.
ड्वेन ब्राव्हो
वेस्ट इंडिज संघाचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने केवळ सर्व टी२० विश्वचषकांमध्ये भाग घेतला नाही, तर तो दोन वेळा जेतेपत मिळवलेल्या वेस्ट इंडिज संघाचाही भाग होता. त्याने आतापर्यंत ३२ टी२० विश्वचषक सामन्यांमध्ये, २२.५२ च्या सरासरीने ५१८ धावा केल्या आहेत, तर गोलंदाजीत २७.०७ च्या सरासरीने २६ बळी घेतले आहेत. या टी२० विश्वचषकानंतर तो निवृत्ती घेणार आहे.
रोहित शर्मा
भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा हा टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला भारताचा यशस्वी फलंदाज मानला जातो. रोहित २००७ साली विजेत्या भारतीय संघाचा भाग होता. रोहितने आतापर्यंत २९ टी२० विश्वचषक सामन्यांमध्ये ३७.३८ च्या सरासरीने ६७३ धावा केल्या आहेत. सर्व टी२० विश्वचषक खेळणारा रोहित एकमेव भारतीय खेळाडू आहे.
ख्रिस गेल
‘युनिव्हर्स बॉस’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ख्रिस गेलला टी२० चा बादशाह म्हटले जाते. या ४२ वर्षीय खेळाडूसमोर विरोधी गोलंदाजांच्या मनात अजूनही भीती आहे. गेलने ३१ टी२० विश्वचषक सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. यादरम्यान त्याने ४६.५० च्या सरासरीने आणि ९४९ धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे यादरम्यान त्याच्या बॅटमधून २ शतके देखील झळकली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
तेलही गेलं अन् तूपही गेलं! परेराकडून वॉर्नरला मिळालं ‘असं’ जीवदान की, सलामीवीरानं ठोकलं अर्धशतक
इट का जवाब पत्थर से! षटकार मारल्यानंतर पुढच्याच चेंडूवर स्टार्कने परेराला केलं ‘क्लीन बोल्ड’