महेंद्र सिंग धोनी… जागतिक क्रिकेट इतिहासातील हा एक सुवर्णअध्याय. कुणी त्याला सगळ्यात यशस्वी कर्णधार म्हणतो, तर कुणी यष्टीमागे चतुर खेळाडू, तर कुणी संघाचा संकटमोचक. थोडक्यात काय तर धोनी आज अनेक खेळाडूंसाठी प्रेरणास्रोत आहे. बऱ्याचशा खेळाडूंनी धोनीच्या नेतृत्त्वाखाली खेळल्यानंतर पुढे भरघोस यश साध्य केले आहे. तर दोस्तहो आज आपण अशा ५ खेळाडूंची माहिती घेणार आहोत, जे कधीकाळी धोनीच्या नेतृत्वाखाली खेळले होते आणि आज ते प्रशिक्षकाची भूमिका पार पाडत आहेत.
स्टीफन फ्लेमिंग-
न्युझीलंड संघाचा दिग्गज खेळाडू म्हणून स्टीफन फ्लेमिंग ओळखले जातात. वास्तविक चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून देखील फ्लेमिंग महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळले आहेत. त्यांनी आयपीएल कारकिर्दीत एकूण १० सामने खेळले होते आणि एकूण १९६ धावा केल्या होत्या. आयपीएल स्पर्धेत त्यांची सर्वोच्च धावसंख्या ४५ धावा होती. पुढे काही वर्षांनी त्यांनी चेन्नई संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली.
मायकल हसी-
मायकल हसी चेन्नई संघाचे प्रमुख सलामीवीर होते. त्यांनी अनेक हंगामात चेन्नईसाठी सलामी फलंदाजी केली होती. ऑस्ट्रेलियाच्या या प्रतिभावान खेळाडूने चेन्नईला २०१० आणि २०११ ची आयपीएल ट्रॉफी जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. आता हसी चेन्नईच्या फलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडत आहेत. महत्वाची बाब अशी की मायकल हसीसुद्धा धोनीच्याच नेतृत्वाखाली चेन्नईकडून खेळून आता प्रशिक्षक झाले आहेत. मायकल हसी यांनी आयपील क्रिकेट करकीर्दीमध्ये ५९ सामन्यांत ३८ च्या सरासरीने १९७७ धावा केल्या होत्या.
लक्ष्मीपती बालाजी-
लक्ष्मीपती बालाजीने आयपीएल स्पर्धेत चेन्नई, कोलकाता आणि पंजाब या संघांचे प्रतिनिधित्व करतांना ७० पेक्षा अधिक सामने खेळले होते, ज्यात त्याने ७६ बळी टिपले होते. बालाजीसुद्धा धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईकडून खेळला आहे आणि २०१८ साली चेन्नईच्या गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली. बालाजीने भारतासाठी देखील काही सामन्यांत जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे.
ब्रेंडन मॅक्यूलम-
न्युझीलंड संघाचा विस्फोटक फलंदाज म्हणून ब्रेंडन मॅक्यूलम म्हणून ओळखला जातो. त्याने आयपीएलमध्येही जबरदस्त कामगिरी केली होती. सुरवातीच्या काही हंगामात मॅक्यूलम कोलकाता संघाचा भाग होता. नंतर तो विविध संघांचा तो भाग राहिला. मॅक्यूलन धोनीच्या नेतृत्वखाली चेन्नईसाठी देखील खेळला होता आणि आता तो कोलकाता संघाचा प्रशिक्षक म्हणून जबाबदारी संभाळतोय.
वसीम जाफर-
वसीम जाफरला त्याच्या घरगुती क्रिकेटमधील जबरदस्त प्रदर्शनामुळे भविष्यातील उत्कृष्ट खेळाडूच्या रुपात पाहिले जात होते. रणजी स्पर्धेतील शानदार कामगिरीमुळे त्याला भारतीय संघात देखील स्थान मिळाले होते. परंतु जाफर कमनशिबी ठरला. त्याला संघात जास्त संधी मिळाली नाही. परंतु तो देखील भारताकडून कसोटी सामने धोनीच्याच नेतृत्वाखाली खेळला होता. आता वसीम जाफर आयपीएलच्या पंजाब संघाचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून आपली भूमिका पार पाडतोय.
महत्त्वाच्या बातम्या-
कर्णधार विलियम्सनच्या अनुपस्थित ‘हे’ खेळाडू SRHच्या नेतृत्त्वपदाचे आहेत प्रबळ दावेदार
बोल्टच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह; गोलंदाज म्हणाला, ‘मला आयपीएल हंगामाचा गोड शेवट करायचा आहे’
चाहत्यांचं प्रेम पाहून परदेशी खेळाडू थक्क; म्हणाला, ‘भारतात क्रिकेट आणि धोनीची पूजा होते’