इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धा सध्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. आतापर्यंत या स्पर्धेत २० सामने खेळले गेले आहेत. तसेच भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अशातच काही खेळाडू आहेत, ज्यांना फ्रॅंचाईजीनी कोट्यावधी रुपये खर्च करत आपल्या संघात स्थान दिले होते. परंतु त्यांनी कोरोनामुळे उर्वरित आयपीएल हंगामामधून माघार घेतली आहे.
ऍडम झंपा : रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा फिरकी गोलंदाज ऍडम झंपा याने आयपीएल २०२१ स्पर्धेतून माघार घेतली आहे. ऑस्ट्रेलियन सरकारने भारतात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता भारतातून येणाऱ्या विमानावर बंदी घातली आहे. त्यामुळे वैयक्तिक कारणाचा हवाला देत ऍडम झंपाने माघार घेतली आहे. त्याला या हंगामात एकही सामना खेळायची संधी मिळाली नव्हती. त्याला बेंगलोर संघाने १.५० कोटींना विकत घेतले होते.
केन रिचर्डसन : केन रिचर्डसनला आयपीएल २०२१ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने ४ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले होते. तसेच त्याला एक सामना खेळण्याची संधी देखील मिळाली होती. परंतु केन रिचर्डसनने वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली आहे. असे स्पष्टीकरण रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने दिले आहे.
लियाम लिविंगस्टोन : आयपीएल २०२१ स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्व करत असलेल्या लियाम लिविंगस्टोनने देखील आयपीएल २०२१ स्पर्धेतून माघार घेतली होती. राजस्थान रॉयल्स संघाने मागील आठवड्यात जाहीर केले की, गेल्या काही महिन्यांपासून बायो बबलमध्ये असल्याने त्याला कंटाळा आला होता. त्यामुळे लियाम लिविंगस्टोनने मायदेशी जाण्याचा निर्णय घेतला होता. त्याला राजस्थान संघाने ७५ लाखांना विकत घेतले होते.
एंड्रयू टाई : राजस्थान रॉयल्स संघाला या आयपीएल हंगामात खूप मोठे धक्के बसले आहेत. आधी जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स आणि आता एंड्रयू टाईने देखील आयपीएल २०२१ स्पर्धेतून माघार घेतली आहे. राजस्थान रॉयल्स संघाने दिलेल्या माहितीत म्हटले होते की, एंड्रयू टाईने वैयक्तिक कारणास्तव आयपीएल स्पर्धेतून माघार घेतली आहे. परंतु एंड्रयू टाईने सेन रेडियोला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, त्याच्या माघार घेण्यामागे बरीचशी कारण आहेत. यातील प्रमुख कारण म्हणजे भारतात वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव आहे.
आर अश्विन : दिल्ली कॅपिटल्स संघाचा प्रमुख गोलंदाज आर अश्विनने देखील आयपीएल २०२१ स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने ट्विट करत म्हटले होते की, “मी उद्यापासून आयपीएलच्या या हंगामातून विश्रांती घेत आहे.माझे कुटुंब आणि विस्तारित कुटुंब कोविड १९ विरुद्ध लढत आहे. मला या कठीण काळात त्यांचे समर्थन करायचे आहे. जर परिस्थिती ठीक असेल तर मी आयपीएल मध्ये पुन्हा येण्याच्या प्रयत्न करेल.”
बेन स्टोक्स : राजस्थान रॉयल्स संघाचा धाकड अष्टपैलू बेन स्टोक्सला १२.५० कोटींसह राजस्थानने रिटेन केले होते. परंतु पूर्ण हंगामात फक्त १ सामना खेळत त्याने मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. परंतु त्याचा उर्वरित हंगाम न खेळण्यामागचे कारण त्याची दुखापत आहे. पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात बोटाला दुखापत झाल्याने तो उर्वरित हंगामाला मुकला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पंजाब किंग्जचे ४.२० कोटी वाया, ‘या’ फलंदाजाचा फ्लॉप शो सुरूच; ६ सामन्यात केल्यात अवघ्या २८ धावा
मोठी बातमी! टी नटराजनच्या गुडघ्यावर झाली शस्त्रक्रिया, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती






