भारत विरुद्ध वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता. यासह भारतीय संघाने या मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. तर मालिकेतील दुसरा वनडे सामना बुधवारी ( ९ फेब्रुवारी) पार पडणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघाला मालिका आपल्या खिशात घालण्याची संधी असणार आहे. त्यामुळे भारतीय संघ मजबूत प्लेइंग ईलेव्हेनसह मैदानात उतरू शकतो. चला तर पाहूया कशी असू शकते दुसऱ्या वनडे सामन्यासाठी भारतीय संघाची प्लेइंग ईलेव्हेन.
टॉप ३ मध्ये होऊ शकतो बदल
वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या वनडे सामन्यात एक मोठा बदल होऊ शकतो. या सामन्यात केएल राहुलचे पुनरागमन होणार आहे. त्यामुळे तो डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकतो. पहिल्या वनडे सामन्यात ईशान किशनने डावाची सुरुवात केली होती. रोहित शर्मा आणि ईशान किशनने भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. केएल राहुलला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. त्यामुळे वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या मालिकेत केएल राहुल फॉर्ममध्ये परतण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली खेळताना दिसून येऊ शकतो.
मध्यक्रमात या फलंदाजांना मिळेल संधी
तसेच मध्यक्रमात चौथ्या क्रमांकावर यष्टिरक्षक रिषभ पंत, पाचव्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव आणि सहाव्या क्रमांकावर दीपक हुड्डा फलंदाजी करताना दिसून येऊ शकतो. हे तिघेही आक्रमक फलंदाजीसाठी ओळखले जातात. हे फलंदाज मधल्या षटकांमध्ये फटकेबाजी करून मोठी धावसंख्या उभारू शकतात.
या फिरकी गोलंदाजांना मिळू शकते संधी
पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघातील फिरकी गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली होती. युझवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना अडचणीत टाकले होते. दोघांनी मिळून १० पैकी ७ फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला होता. यादरम्यान युझवेंद्र चहलने ४ तर वॉशिंग्टन सुंदरने ३ गडी बाद केले होते. या दोघांची कामगिरी पाहता,कुलदीप यादवला पुन्हा एकदा संघाबाहेर राहावे लागू शकते.
वेगवान गोलंदाजांनी केली आहे अप्रतिम कामगिरी
पहिल्या वनडे सामन्यात मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि प्रसिद्ध कृष्णा यांना संधी देण्यात आली होती. या तिनही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली होती. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात देखील या गोलंदाजांना संधी दिली जाऊ शकते.
महत्वाच्या बातम्या :
अँडरसन-ब्रॉडच्या कारकिर्दीला लागला पूर्णविराम? आगामी मालिकेसाठी दाखवला संघातून बाहेरचा रस्ता
सचिनच्या झंझावातापुढे मुंबाची शरणागती! पटना पायरेट्स पहिल्या स्थानी कायम
‘प्लेअर ऑफ द मंथ’साठी आयसीसीने जाहीर केली नामांकने; ‘बेबी एबी’चाही समावेश