क्रिकेट जगतात खेळाडूंमध्ये एकमेकांची प्रशंंसा केली जाते हे आपल्याला माहिती आहे. अशाच प्रकारे ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टिव्ह स्मिथने भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाची प्रशंसा केली आहे.
मागील काही वर्षात जडेजा (Ravindra Jadeja) कसोटी क्रिकेटमध्ये एक शानदार फिरकीपटू म्हणून नावारुपाला आला आहे. यावेळी स्मिथ (Steve Smith) म्हणाला की, जडेजामध्ये एकाच लेंथने गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. तो आपल्या अॅक्शनमध्ये बदल न करता चेंडूची गती बदलू शकतो. हा चेंडू समजण्यास फलंदाजांना कठीण जाते.
“भारतीय उपखंडात रविंद्र जडेजाची कामगिरी शानदार आहे, त्याचा चेंडू एका पाईंटवरुन उसळी घेतो. मला वाटते की चेंडू टाकताना लेंथमधील त्याचे सातत्य त्याच्या यशाचे गमक आहे,” असे स्मिथ म्हणाला.
स्मिथने न्यूझीलंडचा फिरकीपटू गोलंदाज ईश सोधीसोबत (Ish Sodhi) तयार केलेल्या पॉडकास्टमध्ये हे सांगितले. यावेळी तो म्हणाला की, “एक फिरकीपटू जो चांगली गुगली टाकू शकतो किंवा स्लायडर टाकू शकतो, आपल्या बोटांनी फिरकी चेंडू टाकू शकतो, अॅक्शन न बदलता चेंडूची गती बदलू शकतो, तोच चांगला फिरकीपटू आहे, असे मला वाटते.”
स्मिथ पुढे म्हणाला की, “मला संपूर्ण जगामध्ये या सर्व गोष्टी करणारे खूप कमी गोलंदाज पहायला मिळतात. यांपैकी जडेजा एक आहे. त्याच्याविरुद्ध फलंदाजी करणे खूप कठीण जाते.” जर कोरोना व्हायरसचे सावट नसते तर, भारतात आयपीएलमध्ये स्मिथला राजस्थान रॉयल्स संघाकडून (Rajasthan Royals) आणि जडेजाला चेन्नई सुपर किंग्स संघाकडून (Chennai Super Kings) खेळताना पाहता आले असते. परंतु आता १५ एप्रिलपर्यंत आयपीएल स्थगित करण्यात आले आहे.
कोरोना व्हायरसचा (Corona Virus) वाढता प्रादुर्भाव पहाता आयपीएल (IPL) पुढे ढकलण्यात येईल किंवा रद्द करण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण सध्या भारतात २१ दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आले आहे. यानंतर परिस्थिती कशी असेल याबद्दल सध्यातरी काहीच स्पष्ट झालेले नाही.
ट्रेंडिंग घडामोडी-
-लहानपणी तुम्ही ऐकलेल्या क्रिकेटबद्दलच्या ५ खोट्या गोष्टी
-हा महान खेळाडू म्हणतो, माझ्यामुळे धोनी-कोहलीसारखे हिरे मिळाले भारताला
-दक्षिण आफ्रिकेत कसोटी सामने जिंकणारे ३ भारतीय कर्णधार