इंडियन सुपर लीग 2022-23 (आयएसएल) चा दुसरा टप्पा आता अधिक रंजक होताना दिसतोय. प्ले ऑफची शर्यत आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे आणि प्रत्येक संघ विजय मिळवून आपापले स्थान निश्चित करण्यासाठी संघर्ष करताना दिसणार आहे. असाच एक सामना शनिवारी (7 जानेवारी) जमशेदपूरच्या जेआरडी टाटा क्रीडा संकुलावर होणार आहे. जमशेदपूर एफसी तालिकेत 10व्या क्रमांकावर आहे आणि त्यांच्यासमोर 7व्या क्रमांकावर असलेल्या चेन्नईयन एफसीचे आव्हान आहे.
चेन्नईयन एफसीच्या प्ले ऑफच्या आशा अजूनही जीवंत आहेत आणि ते एफसी गोवा व ओडिशा एफसी यांच्या स्थानांना आव्हान देऊ शकतात. या दोन्ही संघांना मागील लढतीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे चेन्नईयन या दोन्ही संघांपेक्षा कमीच सामने खेळले आहेत आणि सलग दोन विजय त्यांना टॉप सहामध्ये पोहचवू शकतात.
जमशेदपूर एफसीला मागील सामन्यात केरळा ब्लास्टर्सकडून 1-3 असा, तर चेन्नईयन एफसीला मुंबई सिटी एफसीकडून 1-2 असा पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे उद्या दोन्ही संघ पुन्हा विजयी मार्गावर येण्यासाठी प्रयत्न करताना दिसतील. दोन आठवड्यांपूर्वी जमशेदपूर एफसीने 2-2 असे एफसी गोवाला बरोबरीत रोखून आश्चर्याचा धक्का दिला होता. पण, केरळा ब्लास्टर्सविरुद्ध त्यांची गाडी पुन्हा रुळावरून घसरली. त्यामुळे मुख्य प्रशिक्षक एडी बुथ्रॉयड चेन्नईयन एफसीविरुद्ध कोणती प्लेइंग इलेव्हन उतरवतात याची उत्सुकता आहे.
बुथ्रॉयड यांनी उद्याच्या सामन्यात सुरुवातच दणक्यात करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. ”हे स्पष्ट आहे की आमच्या गुणांमध्ये मोठा फरक आहे आणि म्हणूनच जर आम्ही सामन्यातील महत्त्वाच्या वेळी हे सोपे गोल स्वीकारणे थांबवले तर तालिकेत बदल पाहायला मिळेल,” असे ते म्हणाले.
चेन्नईयन एफसीने 10 डिसेंबरला नॉर्थ ईस्ट युनायटेडविरुद्ध 7-3 असा दणदणीत विजय मिळवला, परंतु त्यानंतरच्या दोन सामन्यांत त्यांना एक अनिर्णित व एक पराभव अशा निकालावर समाधान मानावे लागले. नॉर्थ ईस्ट युनायटेडविरुद्धच्या सामन्यात अब्देलनासेर अल खयातीने हॅटट्रिक नोंदवली होती आणि तो यंदाच्या पर्वात सर्वाधिक 7 गोल करणाऱ्या क्लेइटन सिल्वा व लालिआंझुआला छांग्टे यांच्यासह संयुक्तपणे अव्वल स्थानावर आहे. त्यामुळे तो संघात असताना प्रतिस्पर्धींच्या मनात धडकी भरणे साहजिक आहे.
चेन्नईयन एफसीचे मुख्य प्रशिक्षक थॉमस ब्रॅडरिच म्हणाले,”आम्ही येथे संघाचा विकास करायला आलो आहोत आणि आम्ही शून्यापासून सुरुवात केली आहे. आम्ही संघबांधणी केली, संघात विकास केला आणि आम्ही स्पर्धात्मक खेळ करतोय.”
जमशेदपूर एफसी आणि चेन्नईयन एफसी यांच्यात हिरो आयएसएलमध्ये 11 सामने झाले आहेत. चेन्नईयन एफसी 5 विजयासह आघाडीवर आहे, तर 3 सामन्यांत त्यांची हार झाली आहे आणि तीन लढती अनिर्णित राहिल्या आहेत. यंदाच्या पर्वातील पहिल्या लढतीत चेन्नईयन एफसीने 3-1 असा विजय मिळवला होता. पीटर स्लिस्कोव्हिच, व्हिन्सी बारेट्टो व अल खयाती यांनी प्रत्येकी एक गोल केला. जमशेदपूरकडून इशान पंडिताने एकमेव गोल केला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ॲलन कोस्टाचा विजयी गोल, बंगळुरू एफसीने अखेरच्या क्षणाला नॉर्थ ईस्टला नमवले
समकालीन दिग्गज फलंदाजाच्या प्रश्नावर लाराने घेतले ‘या’ भारतीयाचे नाव; गोडवे गात म्हणाला, ‘नाकातून रक्त…’