गोवा। आक्रमण व बचाव यांच्यातील चढाओढ हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) च्या रविवारच्या केरळा ब्लास्टर्स एफसी व एससी ईस्ट बंगाल यांच्यातल्या सामन्यात पाहायला मिळाली. पहिल्या हाफमध्ये टॉमिस्लॅव्ह मार्सेला व अल्व्हारो व्हॅजकज यांच्या प्रत्येकी एक गोलच्या जोरावर दोन्ही संघांनी १-१ अशी बरोबरी मिळवली. त्यामुळे आघाडी घेण्याच्या शर्यतीत दुसऱ्या सत्रात दर्जेदार खेळ पाहायला मिळाला. ब्लास्टर्सनं चेंडूवर अधिक ताबा राखत वर्चस्व मिळवले होते, परंतु बंगालकडून त्यांना तोडीस तोड उत्तर मिळाले. या बरोबरीमुळे बंगालची विजयाची पाटी कोरीच राहिली. ऍड्रीयन लुनानं ब्लास्टर्ससाठी गोल करण्याच्या संधी निर्माण केल्या, पण बंगालचा बचाव तितकाच ताकदीचा होती.
१५व्या मिनिटाला सामन्यात नाट्यमय घडामोड घडली. अल्व्हारो व्हॅजकजनं केरळा ब्लास्टर्स एफसीचे गोलखाते उघडले आणि जल्लोष सुरू झाला. पण, व्हॅजकजनं चेंडूला अंतिम दिशा देण्यापूर्वी चेंडू एससी ईस्ट बंगालच्या खेळाडूच्या हाताला लागला होता. त्यामुळे ईस्ट बंगालच्या खेळाडूंनी विरोध दर्शवला. पंचांनी एकमेकांशी चर्चा करून हा गोल रद्द केला व केरळाला फ्री किक दिली. त्यावर गोल करण्यात व्हॅजकज अपयशी ठरला. त्यानंतर ईस्ट बंगालकडून गोल करण्याचे प्रयत्न सुरू झाले.
ईस्ट बंगालनं चेंडूवर अधिक काळ ताबा ठेवताना केरळा ब्लास्टर्सना जखडून ठेवले होते. ३७व्या मिनिटाला राजू गायकवाडच्या हँड थ्रोवर टॉमिस्लॅव्ह मार्सेलानं हेडरद्वारे ईस्ट बंगालचे खाते उघडले. तत्पूर्वी, २५व्या मिनिटाला अँटोनियो पेरोसेव्हिचनं मारलेला चेंडू गोलपोस्टवर आदळून माघारी फिरला. ४४व्या मिनिटाला केरळा ब्लास्टर्सनं बरोबरीचा गोल केला. ज्या व्हॅजकजचा गोल नाकारण्यात आला होता, त्यानेच अप्रतिम गोल करताना पहिल्या हाफमध्ये सामना १-१ असा बरोबरीत आणला.
दुसऱ्या हाफमध्ये दोन्ही संघ एकमेकांच्या क्षेत्रात आक्रमण करताना दिसले, परंतु त्यांचा बचावही तितकाच सुरेख होता. केरळा ब्लास्टर्स पासिंगचा सुरेख खेळ करताना पेनल्टी क्षेत्रात चेंडू खेळवत होते. ईस्ट बंगालनं अखेरच्या २० मिनिटांच्या खेळात सामन्यावर पकड घेण्यासाठी तीन बदल केले. बिकास जैरू, वाहेंगबाम लुवांग आणि आमीर डेरव्हिसेव्हिच यांना मैदानावर उतरवून ईस्ट बंगालनं मधल्या फळीला गती देण्याची रणनीती आखली. तीन ताज्या दमाचे मध्यरक्षक मैदानावर उतरल्यानं ईस्ट बंगालचा खेळ तीव्र झाला. ७४व्या मिनिटाला ईस्ट बंगाल आघाडी घेण्याच्या जवळपास पोहोचला होता, परंतु केरळा ब्लास्टर्नं पेनल्टी क्षेत्रात उभी केलेली बचाव भींत त्यांना भेदता आली नाही.
केरळा ब्लास्टर्सचे खेळाडू चेंडूवर सर्वाधिक काळ ताबा मिळवताना सामन्याचे पारडे त्यांच्या बाजूनं झुकवण्याचा सातत्यानं प्रयत्न करताना दिसले. ७९व्या मिनिटाला व्हॅजकजचा प्रयत्न ईस्ट बंगालच्या शंकर रॉयनं परतवून लावला. पुढच्याच मिनिटाला पेरोसेव्हिचनं गोलजाळीच्या दिशेनं टोलावलेला चेंडू प्रभसुखन सिंगन अडवला. पुन्हा एकदा पेरोसेव्हिचनं मारलेला चेंडू गोलपोस्टच्या वरच्या खांबाला लागून माघारी फिरला. अखेरच्या दहा मिनिटांत खेळातील रंजकता वाढताना दिसली. ईस्ट बंगालकडून आक्रमण वाढले. दोन्ही संघांचा पेनल्टी क्षेत्रातील खेळ अफलातून झाला, परंतु बरोबरीची कोंडी कोणालाच फोडता येत नव्हती. ८८व्या मिनिटाला ऑफ साईडमुळे केरळा ब्लास्टर्सची आघाडी नाकारली गेली. त्यानंतर पेरोसेव्हिचचा वन ऑन वन प्रयत्न केरळा ब्लास्टर्सच्या गोलरक्षकानं अडवला. पाच मिनिटांच्या भरपाई वेळेतही ही कोंडी फुटली नाही.
निकाल – एससी ईस्ट बंगाल – १ (टॉमिस्लॅव्ह मार्सेला ३७ मि.) विरुद्ध केरळा ब्लास्टर्स – १ (अल्व्हारो व्हॅजकज ४४ मि.)
महत्त्वाच्या बातम्या –
ईस्ट बंगालला हवीय नशीबाची साथ; केरळा ब्लास्टर्सविरुद्ध लागणार कसोटी
मेस्सीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, तब्बल सातव्यांदा पटकावला मानाचा ‘बॅलन डी’ओर’
धक्कादायक! फ्रान्सच्या स्टार फुटबॉलपटूला १ वर्षाची शिक्षा, कारण वाचून सरकेल तुमच्याही पायाखालची जमीन