---Advertisement---

सावळा गोंधळ! विकेट वाचवण्याच्या नादात भारतीय फलंदाज धावल्या एकाच दिशेला, अंपायरलाही पाडले पेचात

---Advertisement---

भारतीय महिला क्रिकेट संघाचा शनिवारी (९ ऑक्टोबर) ऑस्ट्रेलिया महिला संघाविरुद्ध टी२० मालिकेतील दुसरा सामना पार पडला. कॅररा ओव्हल स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय महिला संघाला ४ विकेट्सने पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात भारतीय फलंदाजांचे प्रदर्शन निराशाजनक राहिले. त्यातच दिप्ती शर्मा नकोशा पद्धतीने धावबाद झाली. तिच्या धावबाद होण्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

दोन्ही फलंदाज पळाल्या एकाच दिशेने
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदासाठी आमंत्रित केले. पण, भारतीय संघाने नियमित अंतराने विकेट्स गमावल्या. ६१ धावांवर ६ विकेट्स अशी स्थिती असताना पुजा वस्त्राकर दिप्ती शर्माला साथ देण्यासाठी मैदानात उतरली. या दोघींनी भारताचा डाव सावरण्यास सुरुवात केली होती.

पण, असे असतानाच १६ व्या षटकातील दुसरा चेंडू दिप्तीने डीप स्क्वेअर लेगच्या दिशेेने चेंडू फटकावला. यावेळी एलिसा पेरीने बाऊंड्री लाईनजवळ चांगले क्षेत्ररक्षण करत चेंडू अडवला आणि ताहलिया मॅकग्राकडे चेंडू सोपवला. मॅकग्राने चपळाईने तो चेंडू यष्टीरक्षक एलिसा हिलीकडे फेकला.

याचवेळी पुजा आणि दीप्तीने एक धाव पूर्ण केली होती आणि पुजा दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात होती ती त्यासाठी पळाली देखील. पण दीप्तीने उशीरा पळण्यास सुरुवात केली. यानंतर मॅकग्राने चेंडू हिलीकडे फेकल्याचे पाहाताच दीप्ती पुन्हा मागे वळाली. त्यामुळे झाले असे की एकाचवेळी पुजा आणि दीप्ती एकाच दिशेला पळाल्या. त्यामुळे हिलीने दुसऱ्या बाजूच्या स्टंप्सवरील बेल्स उडवत दीप्तीला धावबाद केले.

पण, जेव्हा दीप्ती आणि पुजा एकाच दिशेने धावल्या. त्यावेळी मैदानावरील पंचांनाही नक्की कोण धावबाद झाले हे सांगणे कठीण झाले होते. त्यामुळे तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आली. त्यांनी पाहिलेल्या रिप्लेमध्ये दीप्ती उशीरा क्रिजमध्ये पोहचल्याचे दिसले. त्यामुळे तिला १६ धावांवर माघारी परतावे लागले.

नंतर, पुजाने नाबाद ३७ धावा करत भारताला २० षटकांत ११८ धावांपर्यंत पोहचवले. पुजा आणि दीप्तीव्यतिरिक्त केवळ कर्णधार हरमनप्रीत कौरला दोन आकडी धावसंख्या पार करता आली. तिने २८ धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाने मिळवला विजय 
भारताने दिलेल्या ११९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियानेही चांगली सुरुवात केली नव्हती. पण, एक बाजू सुरुवातीला बेथ मूनीने लावून धरली होती. तिने ३४ धावांची खेळी केली. ती बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव ताहिला मॅकग्राने आक्रमक खेळ करत सावरला आणि ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. मॅकग्राने ३३ चेंडूत ६ चौकारांसह नाबाद ४२ धावा केल्या. त्यामुळे, ऑस्ट्रेलियाने १९.१ षटकात ६ विकेट्स गमावत ११९ धावा करुन सामना जिंकला.

भारतीय महिला संघाकडून राजश्वरी गायकवाडने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच शिखा पांडे, हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्माने प्रत्येकी १ विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या – 

“केएल राहुलकडे चौफेर फटकेबाजीची रोहित शर्मा आणि विराट कोहलीपेक्षा जास्त क्षमता”

Video: शिखा पांडेने टाकला ‘शतकातील सर्वोत्तम चेंडू’? एलिसा हिलीला क्लीन बोल्ड केलेल्या ‘इनस्विंगर’ची सर्वत्र चर्चा

मुंबई इंडियन्सने ‘या’ तीन खेळाडूंना आयपीएल २०२२ साठी करावे संघात कायम, सेहवागने व्यक्त केले मत

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---