क्रिकेटटॉप बातम्याभारताचा ऑस्ट्रेलिया दौरा

Video: शिखा पांडेने टाकला ‘शतकातील सर्वोत्तम चेंडू’? एलिसा हिलीला क्लीन बोल्ड केलेल्या ‘इनस्विंगर’ची सर्वत्र चर्चा

भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील एकमेव कसोटी आणि वनडे मालिका झाली असून आता टी२० मालिका सुरु आहे. टी२० मालिकेतील दुसरा सामना शनिवारी (२ ऑक्टोबर) पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया महिला संघाने ४ विकेट्सने विजय मिळवला. पण, असे असले तरी भारतीय महिला संघाची वेगवान गोलंदाज शिखा पांडेच्या एका चेंडूने सर्वांचेच लक्ष वेधले.

या सामन्यात भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलिया महिला संघाला ११९ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाकडून एलिसा हिली आणि बेथ मूनी या फलंदाज सलामीला उतरल्या. पण, शिखाने पहिल्याच षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला. तिने हिलीला ४ धावांवर त्रिफळाचीत केले. शिखाने सुरेख इनस्विंगर चेंडू टाकला. तिच्या या चेंडूने हिलाला काही कळायच्या आतच स्टंम्प उडवले होते. हा चेंडू पाहून हिलीसह सर्वचजण आश्चर्यचकीत झाले.

भारताचा माजी क्रिकेटपटू वासिम जाफरने शिखाच्या या चेंडूला ‘शतकातील सर्वोत्तम चेंडू’ म्हटले आहे. याशिवाय अनेक चाहत्यांनीही तिच्या या चेंडूला हीच उपाधी दिली आहे. शिखाने या सामन्यात ४ षटके गोलंदाजी करताना २७ धावा दिल्या आणि हिलीची एकमेव विकेट घेतली.

भारतीय महिला संघाचा पराभव 
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. त्यामुळे प्रथम फलंदाजी करण्यासाठी भारतीय महिला संघ मैदानात उतरला. पण संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. भारतीय महिला संघाने नियमित अंतराने विकेट्स गमावल्या होत्या.

पण, अखेर पुजा वस्त्राकरने झुंज देत २६ चेंडूत नाबाद ३७ धावांची खेळी केली आणि संघाला ११८ धावांपर्यंत मजल मारुन दिली. पुजाव्यतिरिक्त या सामन्यात केवळ हरमनप्रीत कौर (२८) आणि दीप्ती शर्माला (१६) दोनआकडी धावसंख्या पार करता आली. ऑस्ट्रेलियाकडून तायला व्लामिंक आणि सोफी मोलिनेक्स यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच ऍश्ले गार्डनर, जॉर्जिया वेअरहॅम आणि निकोला कॅरी यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

त्यानंतर, ११९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियानेही चांगली सुरुवात केली नव्हती. पण, एक बाजू सुरुवातीला बेथ मूनीने लावून धरली होती. तिने ३४ धावांची खेळी केली. ती बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव ताहिला मॅकग्राने आक्रमक खेळ करत सावरला आणि ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. मॅकग्राने ३३ चेंडूत ६ चौकारांसह नाबाद ४२ धावा केल्या.

भारतीय महिला संघाकडून राजश्वरी गायकवाडने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच शिखा पांडे, हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्माने प्रत्येकी १ विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या – 

मुंबई इंडियन्सने ‘या’ तीन खेळाडूंना आयपीएल २०२२ साठी करावे संघात कायम, सेहवागने व्यक्त केले मत

आयपीएल २०२१ मधील प्रवास संपल्यानंतर आता रोहित शर्मा-केएल राहुलसह भारतीय खेळाडू या ठिकाणी येणार एकत्र

‘प्लीज रोहित भारत-पाक सामन्याची २ तिकीटं दे’, चालू सामन्यात चाहत्याची हिटमॅनकडे मागणी

Related Articles