ट्रेलब्लेझर्सविरुद्ध सोमवारी (२३ मे) झालेल्या महिला टी२० चॅलेंज २०२२ स्पर्धेतील पहिल्या सामन्यात सुपरनोव्हाजने ४९ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात सुपरनोव्हाजकडून वेगवान गोलंदाज पूजा वस्त्राकार हिने मॅच विनिंग खेळ दाखवला. तिने भेदक गोलंदाजी करत संघाच्या विजयात मोठा हातभार लावला. सामन्यानंतर तिने आपल्या गोलंदाजी कामगिरीवर प्रतिक्रिया दिली आहे.
पूजाने (Pooja Vastrakar) या सामन्यादरम्यान केवळ १२ धावा देत ४ विकेट्स आपल्या नावावर केल्या. यासह ती महिला टी२० चॅलेंज स्पर्धेत सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी करणारी तिसरीच गोलंदाज (Best bowling figures in Women’s T20 Challenge) ठरली आहे.
तिने आपल्या कोट्यातील ४ षटके टाकताना फक्त १२ धावा देत ट्रेलब्लेझर्सच्या ४ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. ट्रेलब्लेझर्सची कर्णधार स्म्रीती मंधानाला पूजाने प्रिया पूनियाच्या हातून झेलबाद केले. स्म्रीती ३४ धावांवर बाद झाली. त्यानंतर हिली मॅथ्यूज पूजाच्या जाळ्यात अडकली. हिलीला पूजाने तानिया भाटीयाच्या हातून झेलबाद केले. तसेच सोफी डंकले आणि सलमा खातून यांचीही तिने विकेट काढली. तिच्या या शानदार गोलंदाजी प्रदर्शनासाठी तिला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
सामन्यानंतर आपल्या गोलंदाजीबद्दल बोलताना पूजा म्हणाली की, “मी चेंडू योग्य जागी टाकण्याचा आणि विकेट घेण्याचा प्रयत्न करत होते. जेव्हा मी नेट्समध्ये सराव करत होते, तेव्हा माझ्या हातून चेंडू व्यवस्थितपणे निघत होता. त्यामुळे मी सामन्यातही चांगली गोलंदाजी करेल, असा विश्वास मला होता.”
पुढे बोलताना पूजा म्हणाली की, “फलंदाजीनंतर खेळपट्टी गोलंदाजीसाठी अवघड बनेल, याचा आम्हाला अंदाज होता. त्यामुळे आम्ही ठरवले होते की, पावरप्लेमध्ये शक्य तितक्या कमी धावांवर विरोधी संघाला रोखायचे.”
पुढे सुपरनोव्हाज संघातील वातावरणाबद्दल पूजाने प्रतिक्रिया दिली. तसेच जगभरातील एकाहून एक बहाद्दर क्रिकेटपटूंसोबत खेळण्याचा अनुभव कसा आहे, याबद्दलही पूजा बोलली. “आमच्या संघाची बाँडिंग खूप चांगली आहे. काही सराव सत्रांमुळे आम्ही एकत्र होऊ शकलो. संघातील वातावरणही खूप चांगले आहे. जगभरातील क्रिकेटपटूंसोबत खेळायला नेहमीच चांगले वाटते,” असे पूजा म्हणाली.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आशिष नेहराने मारली चहलच्या कंबरेत लाथ, गुजरातने शेअर केलेल्या फोटोची रंगलीय चर्चा
भारीच ना! एबी डिविलियर्स पुन्हा दिसणार आरसीबी संघात, स्वत:च केलाय ‘मोठा’ खुलासा






