भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघादरम्यान सध्या लखनौ येथे पाच वनडे सामन्यांची मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील चौथा वनडे सामना आज सुरु आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करतांना भारतीय संघाने पहिल्या डावात ५० षटकात ५ बाद २६६ धावा केल्या.
यात अनुभवी फलंदाज पूनम राऊतचा मोठा वाटा होता. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या पूनम राऊतने शानदार शतक झळकावले. तिने १२३ चेंडूत नाबाद १०४ धावा केल्या. तिचे हे शतक वनडे क्रिकेटमधील तिसरे शतक ठरले. यासह एका खास यादीत तिने स्थान पटकावले.
पूनम राऊतचे लाजवाब शतक
पूनम राऊतने आजच्या सामन्यात शतक झळकावताना परिपूर्ण फलंदाजीचा नमुना पेश केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने सलामीवीर स्मृती मंधानाची विकेट पाचव्या षटकातच गमावली. त्यांनतर फलंदाजीला आलेल्या पूनमने सावध सुरुवात केली. सेट झाल्यावर मात्र तिने आपल्या भात्यातील सगळे फटके बाहेर काढत अप्रतिम खेळी उभारली. डावाच्या ४९व्या षटकात तिने आपल्या शतकाला गवसणी घातली.
भारताकडून सर्वाधिक वनडे शतके
पूनम राऊतचे भारताकडून खेळताना हे तिसरे वनडे शतक ठरले. यासह महिलांच्या वनडे सामन्यात भारताकडून सर्वाधिक वनडे शतके ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ती तिसऱ्या स्थानी पोहोचली. या यादीत भारताच्या वनडे संघाची विद्यमान कर्णधार मिताली राज अव्वल स्थानी आहे.
मितालीच्या नावे एकूण ७ शतके आहेत. त्यांनतर शैलदार फलंदाज स्मृती मंधानाचा क्रमांक लागतो. तिच्या नावे एकूण ४ शतके आहेत. त्यांनतर तिसऱ्या क्रमांकावर स्फोटक फलंदाज हरमनप्रीत कौर असून तिच्या नावे ३ शतके आहेत. आता आजच्या शतकाने पूनमने हरमनप्रीतची बरोबरी केली आहे.
भारताकडून महिला वनडे क्रिकेट सामन्यात सर्वाधिक शतके :
मिताली राज : ७ स्मृती मंधाना : ४ हरमनप्रीत कौर : ३ पूनम राऊत : ३*
दरम्यान, पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघ १-२ असा पिछाडीवर आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत आव्हान कायम राखण्याचा प्रयत्न भारतीय संघ करेल.
महत्वाच्या बातम्या:
Blog: कोलकाता टेस्ट: अनेकांच्या लॅपटॉपमध्ये कायमची सेव्ह झालेली ती एक इनिंग
मोठी बातमी! विजय हजारे ट्रॉफी फायनलमध्ये पृथ्वी शॉला गंभीर दुखापत, उचलून नेलं मैदानाबाहेर
आयपीएलची चुरस वाढणार, आगामी हंगामात होणार नवीन संघांचा समावेश