दरवर्षीप्रमाणे यावर्षीही क्रिकेटच्या घडामोडीची माहिती देणारे प्रसिद्ध मासिक ‘विस्डेन’ने (Wisden) कसोटी आणि वनडे संघाची निवड केली आहे. २०२०मधील वनडे आणि कसोटी मालिकेतील सर्व संघांच्या प्रदर्शनाच्या आधारावर विस्डेनने वर्षभराचा सर्वश्रेष्ठ संघ निवडला आहे. पण आश्चर्याची बाब म्हणजे, विस्डेनने कसोटी संघात एकाही भारतीय क्रिकेटरला स्थान दिलेले नाही, तर वनडे संघातूनही दिग्गजांना वगळण्यात आले आहे.
विस्डेनच्या कसोटी संघाचे नेतृत्त्वपद न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनलला मिळाले आहे. वर्षभरातील नेतृत्त्व आणि फलंदाजीच्या बळावर विलियम्सनच्या खांद्यावर ही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे, तर वनडे संघाच्या नेतृत्त्वाची सूत्रे ऑस्ट्रेलियन दिग्गज ऍरॉन फिंचच्या हाती देण्यात आली आहेत.
जरी विस्डेनच्या कसोटी संघात एकाही भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात आला नसला, तरी वनडे संघात मात्र २ भारतीयांना जागा मिळाली आहे. वनडे संघाचा सलामीवीर आणि यष्टीरक्षक फलंदाज म्हणून केएल राहुलची निवड करण्यात आली आहे, तर रवींद्र जडेजाला अष्टपैलू खेळाडूच्या रुपात सामाविष्ट करण्यात आले आहे. परंतु विराट कोहली, रोहित शर्मा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांसारख्या दिग्गजांना वनडे संघातून डच्चू मिळाला आहे.
का नाही मिळाले भारतीय खेळाडूंना स्थान?
विस्डेनच्या टीम ऑफ द ईयर २०२०मध्ये भारतीय खेळाडूंना जागा न मिळण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांचे प्रदर्शन आहे. कोविड-१९ महामारीमुळे भारतीय संघाला यावर्षी जास्त कसोटी सामने खेळायला मिळाले नाहीत. भारताने यावर्षात केवळ २ कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील दोन्हीही सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. याच कारणामुळे विस्डेन कसोटी संघ २०२०मध्ये एकाही भारतीय क्रिकेटरचे नाव नाही.
विस्डेन कसोटी संघ २०२०-
डॉम सिब्ले, शान मसूद, केन विलियमसन (कर्णधार), मार्नस लॅब्यूशाने, बाबर आझम, बेन स्टोक्स, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), काईल जेमीसन, स्टुअर्ट ब्रॉड, टीम साऊदी, नॅथन लायन
विस्डेन वनडे संघ २०२०-
ऍरॉन फिंच (कर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), स्टिव्ह स्मिथ, निकोलस पूरन, सॅम बिलिंग्स, ग्लेन मॅक्सवेल, रवींद्र जडेजा, अल्जारी जोसेफ, लुंगी एन्गिडी, जॉश हेजलवुड, ऍडम झाम्पा
महत्त्वाच्या बातम्या-
भारताच्या माजी खेळाडूचे क्रिकेटमध्ये पुनरागमन; मुंबई संघाच्या निवडसमिती प्रमुखपदी झाली निवड