पुणे। ऑलिंपिकमध्ये देशाची कामगिरी उंचावण्यासाठी क्रीडा क्षेत्रासाठी सकारात्मक वातावरण निर्माण होणे महत्त्वाचे होते. खेलो इंडिया महोत्सवाद्वारे हे वातावरण निर्माण झाले आहे. यंदाच्या या महोत्सवात २९ राज्यांच्या खेळाडूंनी पदक तालिकेत नाव मिळविले, हे त्याचेच द्योतक आहे, असे भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या संचालिका नीलम कपूर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे म्हाळुंगे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीमध्ये आयोजित खेलो इंडिया स्पर्धेदरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप प्रधान हे उपस्थित होते.
ऑलिंपिकसारख्या जागतिक दर्जाच्या स्पर्धांकरिता पदक मिळविण्याची क्षमता असणारे नैपुण्य शोधणे व त्याचा विकास करणे हे खेलो इंडियाचे ध्येय आहे. त्यादृष्टीनेच येथील स्पर्धांमध्ये २१ व १७ वर्षाखालील गटांचा समावेश करण्यात आला आहे. हळुहळु त्यापेक्षाही लहान गटाच्या खेळाडूंना या महोत्सवात समावेश करण्याचा प्रयत्न होणार आहे. तसेच हा महोत्सव प्रत्येक राज्यास आयोजित करण्याचीही संधी दिली जाणार आहे, असेही कपूर यांनी सांगितले.
औरंगाबादला जिम्नॅस्टिक्स संकुल उभारणार
महाराष्ट्रात जिम्नॅस्टिक्सकरिता विपुल प्रमाणात नैपुण आहे. हे लक्षात घेऊनच औरंगाबाद येथील क्रीडा प्राधिकरणात जिम्नॅस्टिक्सकरिता नवीन संकुल उभारले जाणार आहे असे सांगून कपूर म्हणाल्या, क्रीडा प्राधिकरणाबरोबरच देशातील अनेक खासगी अकादमींमध्ये भरपूर नैपुण्य उपलब्ध आहे हे लक्षात घेऊनच क्रीडा प्राधिकरण व विविध शाळांमध्ये सुसंवाद निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे या शाळांमधील नैपुण्य शोध घेऊन त्यांचा विकास करण्यास प्राधान्य दिले जाईल. क्रीडा प्राधिकरणामधील प्रशिक्षणाचा फायदा अनेक राज्यांमधील खेळाडूंना मिळत असून येथे पदक मिळविणाºया खेळाडूंमध्ये या खेळांडूंचा अधिकाधिक समावेश आहे.
क्रीडा व शिक्षण हे दोन्ही विषय राज्य शासनाच्या अख्यातारित येत असतात. तरीही या दोन्ही क्षेत्रांची योग्य सांगड घालून शाळा व महाविद्याालयांमधून जागतिक स्तरावरील क्रीडापटू कसे निर्माण होतील यासाठी केंद्रशासनाने राज्य शासनांना सूचनाही दिल्या आहेत. शाळांमधील शिक्षक व खेळाडूंचे पालक यांनी खेळाडूंच्या विकासाकरिता प्राधान्य देण्याची गरज आहे. खेळाडू हेच खरे सदिच्छादूत असतात, असेही कपूर यांनी सांगितले.