fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

केपीआयटी-एमएसएलटीए चॅलेंजर्स टेनिस स्पर्धेत गुणेश्‍वरन, नागल, रामनाथन यांचा खेळ पुणेकरांना पाहण्याची संधी

पुणे। एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या तर्फे आणि एटीपी व एआयटीए यांच्या मान्यतेखाली आयोजित केलेल्या केपीआयटी एमएसएलटीए चॅलेंजर स्पर्धेत भारताचे स्टार टेनिसपटू प्रज्ञेश गुणेश्‍वरन, सुमित नागल, रामकुमार रामनाथन व साकेत मायनेनी यांचा खेळ पाहण्याची संधी टेनिस शौकिनांना मिळणार आहे.

पुण्यातील म्हाळुंगे- बालेवाडी टेनिस संकुलामध्ये 11 ते 17 नोव्हेंबर दरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सलग सहाव्या वर्षी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षी देशात होणारी ही एकमेव चॅलेंजर स्पर्धा असल्याने खेळाडूंसाठी विशेष म्हत्वाची आहे. जवळपास 20 देशातील स्पर्धकांचा सहभाग हे या या स्पर्धेसाठी खास आकर्षण ठरणार आहे.

पीएमडीटीएचे अध्यक्ष आणि आयोजन समितीचे अध्यक्ष, केपीआयटीचे व्यवस्थापकीय संचालक किशोर पाटील म्हणाले की, आम्ही स्पर्धेच्या सातत्यपुर्ण आयोजनाने समाधानी आहोत. हे स्पर्धेचे सलग सहावे वर्ष असून त्यामुळे भारतीय खेळाडूंना मौल्यवान मानांकन गुण मिळवण्यास मदत होते. या स्पर्धेच्या माध्यमातून भारतीय टेनिसपटूंना प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न असतो तर, 10 ते 15 भारतीय खेळाडूंना महत्वपूर्ण एटीपी गुणांची कमाई करता येते.

यावर्षी क्रमवारीनुसार सात भारतीय खेळाडू हे मुख्य फेरीत आहेत. यासोबतच वाईल्ड कार्डद्वारे मुख्य फेरीत प्रवेश मिळवण्याची संधी आणखी चार भारतीय खेळाडूंना मिळणार आहे. या स्पर्धेचे आयोजन हे अशा पद्धतीने करता येते की विजेत्याला ऑस्ट्रेलियन ओपनच्या मुख्य फेरीत प्रवेश मिळतो. त्यामुळे ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या मुख्य फेरीत पोहचू इच्छिणा-या खेळाडूंसाठी ही स्पर्धा महत्वाची आहे. काही चॅलेंजर स्पर्धा शिल्लक असल्याने अनेक चांगल्या खेळाडूंचा प्रयत्न वर्षाचा शेवट विजयाने करण्याचा असेल.तर, काही जणांचा प्रयत्न महाराष्ट्र ओपन स्पर्धेची तयारी करण्याचा असेल. जी याच ठिकाणी होणार आहे.

गेल्या पाच वर्षात या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला अव्वल 100 मानांकित खेळाडूंमध्ये स्थान मिळवण्यास मदत मिळाली होती. यावेळी देखील विजेत्याला अव्वल 100 मानाकांत स्थान मिळविता येईल, अशी अपेक्षा आहे.

राष्ट्रीय पुरुष उपविजेता आर्यन गोवियस यांसह महाराष्ट्राचा ध्रुव सुनीश आणि ध्रुव मुळ्ये यांना मुख्य फेरीसाठी वाईल्ड कार्ड प्रदान करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर म्हणाले की, केपीआयटी-एमएसएलटीए चॅलेंजर ही स्पर्धा जागतिक स्तरावर चांगलीच लोकप्रिय आहे. अनेक चांगले खेळाडू सहभाग नोंदवत असल्यामुळे दरवर्षी या स्पर्धेचा दर्जा उंचावत आहे. नवीन 48 ड्रॉ च्या फॉरमॅटमुळे यावर्षीची कट ऑफ मर्यादा 1170मानांकन गुण अशी होती. त्यामुळे ह्या या स्पर्धेचा दर्जा अतिशय उच्च राहिला आहे. या स्पर्धेमुळे भारतीय खेळाडूंना जागतिक स्तरावरील खेळाडूंविरुद्ध घरच्या मैदानावर खेळण्यास मिळते, याचाही त्यांना फायदा होत असतो. या स्पर्धेसाठी रोलँड हर्फेल यांची सुपरवायझर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर, शितल अय्यर या एटीपी रेफ्री असतील.

या स्पर्धेच्या संयोजन समितीमध्ये पीएमडीटीएचे सचिव अभिषेक ताम्हाणे, खजिनदार कौस्तुभ शहा, जयंत कढे, हिमांशू गोसावी, प्रशांत सुतार, शेखर सोनसळे आणि धनंजय जाधव यांचा समावेश असणार आहे.

पात्रता फेरीत प्रत्येक खेळाडूला दोन सामने खेळावे लागतील व ही पात्रता फेरी सोमवार, 11 नोव्हेंबर मुख्य ड्रॉबरोबरच खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना रविवार, दि.17 नोव्हेंबर होणार आहे. केपीआयटी पुरुष चॅलेंजर विजेत्यास 7200 डॉलर्स (5,10,000 रुपये) आणि 80 एटीपी गुण तर, उपविजेत्यास 4240 डॉलर्स (3,00,000 रुपये) व 48 एटीपी गुण मिळतील.

स्पर्धेच्या नियमित वेळापत्रकाव्यतिरिक्त याच कालावधीत पुणे टेनिस फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येणार असून त्याअंतर्गत टेनिसशी संबंधित विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या महोस्तवात पीएमडीटीए ज्युनिअर गोल्ड सिरिज, पीसीएलटीए पीएमडीटीए सिनियर टेनिस स्पर्धा आणि महाराष्ट्रातील महिला टेनिसपटूनसाठी खास वाईल्ड कार्ड स्पर्धा यासह पुण्यातील टेनिस प्रशिक्षकांसाठीच्या कार्यशाळेचा समावेश आहे. स्पर्धेच्या काळातच होणाऱ्या कार्यशाळेत पुण्यातील 110 टेनिस प्रशिक्षक आपला सहभाग नोंदविणार आहेत.

मुख्य फेरीतील खेळाडू

1. प्रज्नेश गुन्नेस्वरन (भारत 90), 2. जेम्स डकवर्थ (ऑस्ट्रेलिया 133), 3. सुमित नागल (भारत 129), 4. स्टीव्हन डायझ(चीन 136), 5. जय क्लार्क(ग्रेट ब्रिटन 194), 6. रामकुमार रामनाथन(भारत 193), 7. रॉबेर्टो ओर्टेगा ओल्मेडो(246), 8. ससीकुमार मुकुंद (भारत 236)

मुख्य फेरीतील इतर भारतीय खेळाडू

साकेत मायनेनी(भारत 259), सिध्दार्थ रावत(भारत 528), अर्जुन कढे(भारत 554), मनिष सुरेशकुमार(715), एन विजय सुंदर प्रशांत(988), कुणाल आनंद(1022), आदिल कल्याणपूर(1025), निकी पोनाचा(1097), अनिरुद्ध चंद्रशेखर(1177).

मागील ५ वर्षातील विजेतेपद मिळवणारे खेळाडू –

ऐकेरी गट
2014: युची सुगिता(जपान) वि.वि ऑड्रीयन मेनॅंडेझ-मॅसेरास(स्पेन) 6–7 (1–7), 6–4, 6–4
2015: युकी भांब्री(भारत) वि.वि एव्हजेनी डॉन्स्कोय(रशिया) 6–2, 7–6 (7–4)
2016: सादीयो डोंबीया(फ्रान्स) वि.वि प्रज्नेश गुन्नेस्वरन (भारत) 4–6, 6–4, 6–3
2017: युकी भांब्री(भारत) वि.वि रामकुमार रामनाथन(भारत) 4–6, 6–3, 6–4
2018 :इलियास यमेर(बेल्जीयम) वि.वि प्रज्नेश गुन्नेस्वरन (भारत) 6-2,7-5

दुहेरी गट
2014: साकेत मायनेनी/सनम सिंग(भारत) वि.वि सनचाई/सोनचात रातीवाताना (थायलंड) 6–3, 6–2.
2015: जेरार्ड ग्रॅनॉलर/ ऑड्रीयन मेनॅंडेझ-मॅसेरास(स्पेन) वि.वि मॅक्सिमिलियन न्यूचरिस्ट (ऑस्ट्रिया)/ दिविज शरन(भारत) 1–6, 6–3, [10–6]
2016: पुरव राजा/दिविज शरन(भारत) वि.वि लुका मारगारोली(स्वित्झरलॅंड)/ह्युगो नायसी (फ्रान्स) 3–6, 6–3, [11–9]
2017: टॉमिसलाव्ह ब्रिकिक/ अँटे पेविक वि.वि पेड्रो मार्टिनेझ/ ऑड्रीयन मेनॅंडेझ-मॅसेरास(स्पेन) 6-1,7-6(5)
2018 : एन विजय सुंदर प्रशांथ/रामकुमार रामनाथन(भारत) वि.वि हिसिए चे एनजी- पेंग/ यांग प्सु-हुआ (तायपे) 7-6(3),6-7(5),10-7

 

You might also like