टीम इंडियासाठी पदार्पणाच्या कसोटीतच शतक झळकावणारा युवा फलंदाज पृथ्वी शॉ गेल्या बऱ्याच काळापासून संघाबाहेर आहे. तो टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी सतत प्रयत्न करतोय, मात्र अजून त्याला यश मिळालेलं नाही. तरीही पृथ्वीनं हार मानलेली नाही. तो विविध स्पर्धांमध्ये सातत्यानं धावा करत आहे. आता इंग्लंडमध्ये त्याच्या बॅटनं पुन्हा आग ओकली, जेथे त्यानं 97 धावांची खेळी खेळली.
पृथ्वी शॉ इंग्लंडमधील वनडे चषकात नॉर्थम्प्टनशायरकडून खेळत आहे. काही दिवसांपूर्वीच त्यानं झंझावाती अर्धशतक झळकावलं होतं. आता त्यानं पुन्हा एकदा एक स्फोटक खेळी खेळली आहे, मात्र तो आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. पृथ्वी शॉच्या संघाला डरहमकडून चार गडी राखून पराभव पत्कारावा लागला.
या सामन्यात नॉर्थम्प्टनशायरनं प्रथम फलंदाजी केली. संपूर्ण संघ 49.2 षटकात 260 धावांवर ऑलआऊट झाला. पृथ्वी शॉनं सर्वाधिक 97 धावा केल्या. त्यानं 71 चेंडूत 16 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं ही खेळी खेळली. पृथ्वी 23व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बाद झाला आणि त्याचं शतक अवघ्या तीन धावांनी हुकलं.
शॉ आऊट झाल्यानंतर नॉर्थम्प्टनशायर संघ पूर्णपणे विस्कळीत झाला. त्यांच्या एकापाठोपाठ एक विकेट्स जात राहिल्या. शॉ नंतर जॉर्ज बार्टलेटनं संघाकडून सर्वाधिक 34 धावा केल्या. पृथ्वी शॉनं याआधी मिडलसेक्सविरुद्ध झंझावाती 76 धावा केल्या होत्या. त्यानं इंग्लंडमध्ये आपला फॉर्म दाखवून टीम इंडियाचा दरवाजा पुन्हा ठोठावला आहे. आता नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर त्याला संधी देतात की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे.
डरहमकडून पॉल कौगिन, स्कॉट बोर्थविक आणि कॉलिन अकरमननं प्रत्येकी दोन बळी घेतले. तर बास डी लीडे आणि जॉर्ज ड्रिसेल यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
हेही वाचा –
भारत विरुद्ध श्रीलंका सामना टाय झाला मग सुपर ओव्हर का नाही? जाणून घ्या आयसीसी नियम
क्रिकेटचा थरार होणार डबल! भारतातील या शहरात बांधण्यात येणार आणखी एक आंतरराष्ट्रीय स्टेडियम
भारतानं दोनच वनडे विश्वचषक जिंकले, मग जर्सीवर तीन स्टार्स कसे?