शिखर धवनच्या नेतृत्वातील भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर पोहोचला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वातील वरिष्ठ भारतीय संघ इंग्लंडमध्ये असताना भारताचा आणखी एक संघ श्रीलंकेत खेळेल. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अशी घटना केवळ दुसऱ्यांदा होत आहे. या दौऱ्यावर भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणून दिग्गज भारतीय फलंदाज व राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक राहुल द्रविड काम पाहतील. राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षणाविषयी संघाचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ याने नुकतीच प्रतिक्रिया दिली.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणे आनंददायी
मुंबई क्रिकेट संघाचा कर्णधार व युवा सलामीवीर पृथ्वी शॉ याची श्रीलंका दौऱ्यावर सलामीवीर म्हणून निवड झाली आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील व आयपीएलमधील कामगिरीने त्याने राष्ट्रीय संघात पुनरागमन केले. तो भारतीय संघाने २०१८ मध्ये जिंकलेल्या १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार होता.
मालिका सुरू होण्यापूर्वी त्याने दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याविषयी म्हटले, “राहुल सरांच्या मार्गदर्शनाखाली खेळणे आनंददायी असते. ते आमच्या १९ वर्षाखालील संघाचे प्रशिक्षक होते. त्यांना खेळाविषयी सर्व काही माहित आहे. ते परिस्थिती कशी आहे हे पटकन जाणतात व त्याविषयी रणनीती तयार करतात. त्यांच्याशी पुन्हा एकदा तासनतास बोलून मार्गदर्शन घ्यायला नक्कीच आवडेल. राहुल सरांना शिस्त अपेक्षित असते. मी पहिल्या सराव सत्रासाठी उत्सुक आहे.”
भारताचा श्रीलंका दौरा १३ जुलैपासून सुरू होईल. या दौऱ्यावर तीन वनडे व तीन टी२० सामने खेळले जातील. सर्व सामने कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहेत.
प्रशिक्षकपदाचा दांडगा अनुभव
भारताच्या सर्वकालीन महान फलंदाजांपैकी एक असलेले द्रविड प्रथमच राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक बनले आहेत. मात्र, १९ वर्षाखालील संघाला व इंडिया अ संघाला ते २०१५ पासून मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने २०१८ मध्ये १९ वर्षाखालील मुलांचा विश्वचषक जिंकला होता. तर, २०१६ व २०२० १९ वर्षाखालील विश्वचषकात भारतीय संघाने अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती.
महत्त्वाच्या बातम्या –