आपल्या झंझावाती फलंदाजीसाठी ओळखला जाणारा भारतीय फलंदाज पृथ्वी शॉ याला टीम इंडियातून वगळण्यात आले असले तरी हा खेळाडू आपल्या बॅटने कहर करत आहे. पृथ्वी शॉ सध्या इंग्लंडमधील वनडे कप स्पर्धेत नॉर्थम्प्टनशायरकडून खेळत असून या संघासाठी त्याने अप्रतिम फलंदाजी कामगिरी केली आहे. पृथ्वी शॉने रविवारी (04 ऑगस्ट) आपल्या संघाला 130 धावांनी मोठा विजय मिळवून दिला.
वॉर्सेस्टरशायर संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात सलामीवीर शॉने 72 धावांची वादळी खेळी केली. 1 खणखणीत षटकार व 10 चौकारांच्या मदतीने केवळ 59 चेंडूत त्याने ही शानदार खेळी केली. हे शॉचे वनडे कप स्पर्धेतील सलग तिसरे अर्धशतक होते.
शॉने वनडे कप स्पर्धेदरम्यान शानदार फलंदाजी करत आपल्या संघासाठी सर्वाधिक 294 धावा केल्या आहेत. शॉने गेल्या तीन डावांत अर्धशतके झळकावली आहेत, त्यापैकी एकदा त्याचे शतक अवघ्या तीन धावांनी हुकले आहे. शॉने या स्पर्धेत 44 चौकार आणि 4 षटकार मारले असून त्याची फलंदाजीची सरासरीही 58.80 आहे. शॉने आपल्या संघासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. मात्र त्याच्या संघाने आतापर्यंत 5 पैकी फक्त एकच सामना जिंकला आहे.
शॉ वर गौतम गंभीरची नजर असेल!
पृथ्वी शॉ जवळपास तीन वर्षांपासून भारतीय संघातून बाहेर आहे. त्याने जुलै 2021 मध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. पण आता तो ज्या प्रकारे चांगली कामगिरी करतोय, ते पाहता आता या खेळाडूकडे सर्वांचे लक्ष असेल असे वाटते. शॉला विशेषत: नवीन मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरकडून अपेक्षा असतील. कारण गंभीर नेहमीच त्याच्या खेळाचा चाहता राहिला आहे. गौतम गंभीरने गेल्या वर्षी एका मुलाखतीत शॉचे वर्णन टी20 फॉरमॅटमधील सर्वोत्तम खेळाडू म्हणून केले होते. तसेच पृथ्वी शॉ टी20 फॉरमॅटमध्ये शुबमन गिलपेक्षा सरस असल्याचेही गंभीरने म्हटले होते. त्यामुळे आता भारतीय संघाच्या आगामी टी20 मालिकांमध्ये शॉला पुनरागमनाची संधी मिळेल की नाही, हे पाहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
पोलार्डनं ठोकला खतरनाक षटकार! समालोचन करणारा संगकारा थोडक्यात हुकला, पाहा VIDEO
बांगलादेशचा हिंदू क्रिकेटपटू लिटन दासचं आंदोलकांनी खरंच घर पेटवलं का? जाणून घ्या सत्य
आयपीएल 2025च्या हंगामात बदलणार 6 संघांचे कर्णधार?